पुणे - Vasant More on Jitendra Awhad ( Marathi News ) जितेंद्र आव्हाड हे माझ्यापेक्षाही मोठे कलाकार आहेत. वसंत मोरे हा कलाकार नाही. त्यांना वसंत मोरे समजला नाही. समजायचं असेल तर त्यांना पुण्यात यावं लागेल. पुण्यात वसंत मोरेंचे काम पाहावे लागेल. त्यानंतर वसंत मोरे कलाकार आहे की कार्यकर्ता हे समजेल असा पलटवार वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी आव्हाडांवर केला आहे.
वसंत मोरे म्हणाले की, चेहऱ्यावरून नव्हे तर वसंत मोरेंच्या कामावरून प्रकाश आंबेडकर मला ओळखतात. ही माझी पावती आहे. जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचं काम बघायची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवक आहेत. तिथे १५ वर्षात मी केलेले काम पाहायचे असेल तर जितेंद्र आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेचं काम काय, किती लोकांनासाठी काम करतो हे कळेल असं उत्तर मोरेंनी दिले.
त्याशिवाय एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता इतक्या खालच्या पातळीवर बोलत असेल. मी मुरलीची मुरली वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल. पुण्यात आले, इथं बोलले, जितेंद्र आव्हाडांनी जो गरिबांवर अन्याय केलाय, फेसबुकवर लिहिलेल्या एकाला घरात बोलावून मारलं, अशा नेत्याला सर्वसामान्यांचे दु:ख काय कळणार आहे. वसंत मोरेंचं तुम्हाला आव्हान आहे. मी काय काम केले असेल ते पाहायला पुण्यात या असं वसंत मोरे यांनी म्हटलं.
राज ठाकरेंची आठवण
गुढीपाडव्यानिमित्त आज १०० टक्के शिवतीर्थाची आठवण येते, आज पहिल्यांदाच गुढी उतरताना मी माझ्या घरी असेन, गेली कित्येक वर्ष मी गुढी उतरताना मुंबईत शिवतीर्थावर होतो. आज मी घरी असणार आहे. आता त्या विषयात जाऊ शकत नाही. ज्या आठवणी आहेत त्या कायम राहतात. गोड आठवणी माणसाने कधी विसरू नये आणि मी ते विसरणारही नाही असं भाष्य वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यावर केले.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंमध्ये असे संविधानातले कोणते गुण पाहिले? संविधानासाठी लढताना त्यांनी कुणी पाहिलं नाही. कुठल्या दलितांच्या मदतीला ते गेले नाहीत. वंचितचं हे गणित कळत नाही. वसंत मोरे हे काय कलाकार आहेत त्यांची कलाकारी काय हे मला समजलेले नाही. पुण्यात रविंद्र धंगेकरांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी वंचितने मोरे यांना उमेदवारी दिली नाही ना? असा संशय आव्हाडांनी व्यक्त केला होता.