Pune Loksabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचारात सक्रिय झाले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रचारसभा घेतली. या सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय.
पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मतदान करा हे सांगितलं जातं आहे. पण मुस्लिम समाज सूज्ञ आहे. तसंच या प्रकारे फतवे काढले जात असतील तर मी पण एक फतवा काढतो असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन यावेळी केलं. तसेच ज्यांना धार्मिक धुमाकूळ घालायचा आहे पण गेल्या १० वर्षात डोकं वर काढता आलं नाहीये. त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढायचं आहे. पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर हे धर्मांध रस्त्यावर फिरणं कठीण करून ठेवतील, अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्या दिल्लीवारीबद्दल भाष्य केलं.
"राज ठाकरे हे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या यादीत योग्य आहेत हे मराष्ट्राच्या जनतेला माहिती होतं. त्यामुळे मजबुरीने त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितले गेले की प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून राज ठाकरेंना प्रचार करावा लागतोय," अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
"जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत. मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असतील तर आज हा राज ठाकरे फतवा काढतोय, "तमाम हिंदू माता-भगिनी-बांधवांसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा," असं राज ठाकरेंनी म्हटलं.