पुणे: आज पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली होती. ''काम झालेलं नसताना पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होतंय'', असं शरद पवारम्हणाले होते. त्यानंतर आता भाजपाकडून पवारांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यातं आलं आहे. ''आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही", असं भाजपानं म्हटलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?शनिवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार नाही. पण, मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही. महिन्यापूर्वीच मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. काम झालं नाही तरी उद्घाटन होत आहे'', असं शरद पवार म्हणाले होते.
असा आहे पंतप्रधानांचा पुणे दौरामहामेट्रोच्या पुणे आणि पिंपरी येथील प्राधान्य मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सतर्कता म्हणून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.