ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - पालखी सोहळयासाठी जास्तीत जास्त भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटीही सज्ज झाली आहे. एसटीच्या पुणे विभागाकडून रविवार (दि. 26) पासून आळंदी आणि देहूसाठी जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट डेपो मधून या गाडयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आळंदी आणि देहूच्या पालखी प्रस्थानापूर्वी मंगळवार (दि. 28) पासून प्रत्येक दिवशी 32 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.
अवघ्या आठवडयाभरावर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयासाठी राज्यभरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात. त्यातच या वर्षी पालखी पूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरातून स्वारगेट येथे आलेल्या भाविकांना आळंदीला जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यात रविवार आणि सोमवारी प्रत्येकी 16 जादा गाडया तर मंगळवार आणि बुधवारी प्रत्येकी 32 जादा गाडया सोडल्या जाणार आहेत. या गाडया प्रामुख्याने स्वारगेट ते आळंदी आणि देहूसाठी सोडल्या जाणार असून देहू ते आळंदी या मार्गावरही विशेष गाडया सोडण्यात येणार असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.
सासवड-पुण्यासाठी 100 जादा गाडया
पुणे शहरात दोन्ही पालखी सोहळे आल्यानंतर शहरातील हजारो नागरीक पुणे ते सासवड या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयात पायी वारी करतात. त्यानंतर सासवड वरून हे भाविक परत येतात. या भाविकांसाठी एसटीकडून यंदा तब्बल 100 जादा गाडया सोडल्या जाणार आहेत. पुणे स्टेशन, स्वारगेट तसेच शिवाजीनगर डेपोंसाठी या गाडया असणार आहे. प्रत्येक भाविकाला बसण्यासाठी जागा मिळावी या उद्देशाने ही सोय करण्यात आली आहे. याशिवाय पालखी पुणे ते सासवड या मार्गावर असताना, एसटीच्या गाडयांची वाहतूक बोपदेव घाट मार्गे करण्यात येणार असल्याचेही एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या जादा गाडयांसाठी सासवड डेपो मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.