ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - माणसाचा इमानी सहकारी असलेला श्वान म्हणजेच कुत्र्याने आपल्या मालकाच्या प्रेमापोटी त्याचा जीव वाचवल्याची किंवा जीव दिल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याचेही निधन झाले, ही कहाणी तर सर्वश्रुत आहेच. मनुष्य आणि कुत्र्याच्या प्रेमाच्या अनेक कथा असतानाच पुण्यात कुत्र्याच्या मुत्यूमुळे शोकाकुल झालेल्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
हर्षवर्धनसिंग राघव असे त्या २२ वर्षीय तरूणाचे नाव असून तो खडकी येथील रहिवासी होता. सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकणा-या हर्षवर्धनसिंगने काल रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ' आपल्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे' त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
हर्षवर्धनसिंग मुळचा छत्तीसगडचा राहणारा होता. मागील दोन वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या हॉस्टेलमधे राहत होता. शनिवार आणि रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटमध्ये रहायला जायचा. पुण्यात राहत असला तरी हर्षवर्धनसिंगला त्याच्या छत्तीसगडमधील घरातील कुत्रा, बोस्कीचा खूप लळा होता. मात्र, काही दिवसांपूर्वी बोस्कीचा मृत्यू झाला, त्यामुळे हर्षवर्धनसिंग निराश होता.
अखेर शोकाकुल मनस्थिथीतच हर्षवर्धनसिंगने नातेवाईकांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली. ‘मी माझ्या बोस्कीकडे जात आहे. त्याबद्दल कोणाला दोष देऊ नये’, असे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले. हडपसर पोलिस ठाण्यात हर्षवर्धनच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.