नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या काळात पुण्यातील विमानतळ बंद राहणार आहे. मात्र, या काळात ब्लेड इंडिया ही कंपनी आपल्या खासगी विमानतळावरून (व्हर्टिपोर्ट) पुणे ते मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा देणार आहे.ब्लेड इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. पुण्याजवळील खराडी येथील ‘पुणे व्हर्टिपोर्ट ते जुहू एअरोड्रोम या दरम्यान ही हेलिकॉप्टर सेवा चालविली जाईल. हे अंतर हेलिकॉप्टरने ४० मिनिटांत पार केले जाईल. पुणे-मुंबई प्रवासाचे भाडे १५,५०० रुपये आणि परतीचे भाडे (रिटर्न फेअर) २९,५०० रुपये (कर वेगळे) असेल.निवेदनात म्हटले की, एका दिवसात दोन हेलिकॉप्टर उड्डाणे होतील. पुणे-मुंबई हेलिकॉप्टर सकाळी ९.३० वा. आणि दुपारी ३.३० वा. निघेल. मुंबई-पुणे उड्डाणांची वेळ सकाळी १०.३० आणि दुपारी ४.३० अशी असेल. पुणे विमानतळ बंदच्या काळात हीच एकमेव हवाई वाहतूक सेवा उपलब्ध असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्लेड ही अमेरिकी कंपनी असून, ब्लेड इंडिया ही ब्लेड यूएसए आणि दिल्लीतील हंच व्हेंचर यांची भागीदारीतील कंपनी आहे. पुणे विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. गेल्यावर्षी कोविड लसीच्या वाहतुकीसाठी दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले होते.
विमानतळ बंद असताना पुणे-मुंबई हेलिकॉप्टर सेवा, आजपासून १५ दिवस धावपट्टीची दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 7:08 AM