पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७०/३० टक्के कोट्याचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मेडिकल प्रवेशासाठी एकमेकांशी स्पर्धा होणार आहे. सद्यःस्थितीचा विचार करता मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून विदर्भ ,कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या १३ सप्टेंबर रोजी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण तयारीनिशी उतरावे लागणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर व वैधानिक विकास महामंडळाच्या रचनेनुसार महाराष्ट्रातील वैद्यकीयमहाविद्यालयांमधील मेडीकल प्रवेशाच्या जागांसाठी ७०/ ३० चा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधिमंडळात हा कोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे यापुढील काळात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश मिळणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ७० टक्के कोट्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना जास्त जागा उपलब्ध होत होत्या. तसेच विद्यार्थ्यांना पुणे,मुंबई मधील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत होता. याउलट विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही आपल्या भागातील महाविद्यालयांमधील प्रवेशावरच समाधान मानावे लागत होते. मात्र ,आता सर्व विद्यार्थी समान पातळीवर गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे नामांकित अनुदानित महाविद्यालयांचा कटऑफ सुमारे २५ गुणांनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, मेडिकल प्रवेशाचा कोट्याचा नियम रद्द झाल्याने सर्वांना स्पर्धा करता येणार आहे. लातूर ,नांदेड ,उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी नीट परीक्षेत चांगली कामगिरी दाखवत आहेत. आता या विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा पर्याय पूर्णपणे खुला झाला आहे. त्यामुळे कमी गुणांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठवाडा व विदर्भातील महाविद्यालयात प्रवेशासाठी जावे लागू शकते. गोट्याचा नियम रद्द झाल्यामुळे एमबीबीएस प्रवेशासाठी पुणे, मुंबई शहरातील नामांकित अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांचा 550 गुणांपर्यंत जाणारा कटऑफ सुमारे २५ गुणांनी वाढू शकतो.
प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, या निर्णयामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी सध्या चांगली कामगिरी दाखवत असल्यामुळे विदर्भातील २० टक्के व पश्चिम महाराष्ट्रातील १० टक्के जागांवर अशा ३० टक्के जागांवर मराठवाड्यातील विद्यार्थी प्रवेश मिळवतील, अशी शक्यता वाटते. तसेच या पुढील काळात नांदेड, लातूर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी स्पर्धा वाढेल.-----------------------पुणे हे विद्येचे माहेरघर असले तरीही वैद्यकीय प्रवेशाचा तयारी मध्ये अजूनही मागे आहे.त्याचप्रमाणे यापुढे वैद्यकीय प्रवेश मिळावा यासाठी मराठवाडा विदर्भातून इयत्ता बारावी साठी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल.- हरीश बुटले, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक्रम--------------