ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील ४ आयएएस अधिका-यांना सहसचिवपदाची पदोन्नती दिली असून त्यामध्ये पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा आहे. सहसचिवपदाच्या यादीत कुमार यांचे नाव आल्याने त्यांची बदली झाल्याचा संभ्रम निर्माण झाला होता मात्र आपली बदली झाली नसून केवळ पदोन्नती देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने १९९९ च्या आयएएस बॅचमधील २० अधिकाºयांना पदोन्नती दिली आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेमध्ये कुणाल कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे महापालिकेने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम पुण्यात घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसंती दर्शविली होती. त्यामुळे कुणाल कुमार यांची चांगली प्रतिमा केंद्रात तयार झालेली आहे. केंद्राचा सहसचिवपदाचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्राच्या सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सध्या आपली बदली झालेली नसून केवळ सहसचिवपदी पदोन्नती झाल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
कुणाल कुमार यांच्यासह ऋचा बागला, अतुल पटणे, अंशु सिन्हा या महाराष्ट्रातील अधिका-यांनाही सहसचिव पदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचबरोबर १९९९ बॅचच्या हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाला आदी राज्यातील १६ अधिका-यांचा या यादीमध्ये समावेश आहे.