पुणे : पुणे शहरात उच्छाद मांडलेल्या मोकाट डुकरांना चाप लावण्याची खूणगाठ महापालिका प्रशासनाने बांधली असून शहरात मोकाट अगर भटकी डुकरे आढळल्यास त्यांना 'शूट ऍट साईट'चे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या डुकरांच्या संख्येमुळे नागरिक वैतागले आहेत. कचराकुंड्या, नाल्यांजवळ आढळणाऱ्या डुकरांमुळे अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. महापालिकेने वेळोवेळी नसबंदी करूनही डुकरांची संख्या आटोक्यात येत नव्हती. ही डुकरे रस्त्यात आडवी जात असल्याने नागरिकांना दुखापतही झाली आहे. या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. अखेर महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर कठोर पावले उचलली असून त्यादृष्टीने जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या प्रकटनात महापालिका अधिनियमातील तरतूदीचा आधार महापालिका प्रशासनाने घेतला असून, महापालिकेकडून येत्या 10 सप्टेंबर पासून शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी डुक्कर मुक्त मोहीम पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रकटनामध्ये पुणे शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांच्या उपद्रवामुळे मालमत्तेचे नुकसान, रहदारीस अडथळा झाल्याचे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. डुकरांपासून संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाल्याचे त्यात म्हटले आहे.तसेच महानगरपालिका अधिनियम चॅप्टर १४ (२२)(३) मध्ये कोणतेही डुक्कर भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्त निर्देश देतील अशा रीतीने त्या डुकराच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येईल आणि अशा रीतीने कोणत्याही डुकराबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणताही दावा सांगता येणार नाही अशी तरतूद आहे असे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. आयुक्त सौरभ राव यांनी कार्यभार घेतल्यापासून हा पहिलाच धडाकेबाज निर्णय असून त्याचे कोणते पडसाद शहरात उमटतात हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.