लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सोमवारी पुणे महापालिकेच्या कर्जरोख्यांची (बॉण्ड) आॅनलाइन बोली लावण्यात आली. अवघ्या काही तासामध्ये ७.५९ टक्के या सर्वात कमी मिळालेल्या व्याजदरावर कर्जरोख्यातून २०० कोटी रूपये पालिकेने उभारले आहे. मंगळवारी पालिकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. महापालिकेचे कर्जरोखे येत्या २२ जून रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या यादीमध्ये समाविष्ट होणार आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की, महापालिकेचे कर्जरोखे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला. यात देशातील प्रमुख बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड अशा एकूण २१ गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. सर्वात कमी व्याजदर ७.५९ टक्के इतका मिळालेला आहे. त्यानुसार २०० कोटी रूपयांचे कर्जरोखे महापालिका घेणार असून ते पैसे उद्याच पालिकेच्या खात्यात जमा होतील. या कर्जरोख्यातून जमा झालेल्या पैशांमुळे नागरिकांना २४ तास शुध्द पाणी देता येणे पालिकेला शक्य होणार आहे.महापालिकेकडून २०० कोटी रूपयांचे कर्जरोखे काढण्यात आले होते. मात्र, त्याला ६ पटींनी अधिक प्रतिसाद मिळून १२०० कोटी रूपयांपर्यंतचे कर्जरोखे खरेदी करण्याची तयारी गुंतवणूकदारांनी दाखविली. सर्वात कमी व्याजदर आकारणाऱ्या संस्थांकडून २०० कोटी रूपयांचे कर्जरोखे पालिकेकडून १० वर्षांच्या मुदतीसाठी खरेदी केले जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विकासासाठी कर्जरोखे उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरली आहे. - कुणाल कुमार, आयुक्त-पुणे महानगरपालिका
पुणे महापालिकेने कर्जरोख्यातून उभारले २०० कोटी
By admin | Published: June 20, 2017 1:38 AM