Chandrakant Patil Accident: काही महिन्यांपूर्वी पुण्यात बिल्डरच्या बाळाने महागड्या पोर्शे कारने दोन जणांचा बळी घेतला होता. यानंतर मुंबईत अशाच घटना घडल्या होत्या. यानंतर चक्क भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या गाडीने नागपुरात चार-पाच गाड्यांना धडाम् केले होते. हे सर्व मद्यप्रेमींनी केलेले प्रताप होते. ही प्रकरणे शांत होत नाहीत तोच काल रात्री पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यालाच मद्यधुंद कारचालकाने घडक दिली आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देत होते. यावेळी एका कार चालकाने पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या कारला जोरदार धडक दिली. हा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यावर ड्रँक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ड्रँक अँड ड्राईव्हच्या घटना वाढू लागल्या आहेत. पुण्यात बिल्डर बाळाला कशाप्रकारे वाचविण्याचा प्रयत्न झालेला हे सबंध देशाने पाहिले. यानंतर मुंबईत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाने दोघांना उडविले होते. मुंबईत अशा दोन-तीन घटना घडल्या होत्या. सरकार या लोकांना वाचवत असल्याचे आरोप विरोधक करत असताना मागील आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कारने नागपुरात चार-पाच गाड्यांना उडविले. ती गाडी बावनकुळेंच्या मुलाचा मित्र चालवत होता. तर मुलगा बाजुला बसला होता. कारचा चालक आणि अन्य एकाची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी केली. परंतू बावनकुळेंच्या मुलाची चाचणी केली गेली नाही. पोलिसांनी बावनकुळेंचा मुलगा कारमध्ये होता हे आम्हाला माहितीच नव्हते, असे कारण देऊन टाकले. आता दारुड्यांची हिंमत एवढी वाढली की त्याने थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच नेऊन कार धडकवली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होत आहे.
गेल्याच आठवड्यात पौड फाट्यावर छोटा हत्ती चालकाने मनसेचा पदाधिकारी आणि त्याच्या पत्नीला उडविले होते. यात पत्नीचा मृत्यू झाला होता. पुण्यात या घटना नित्याच्याच झाल्या असून आतातरी सरकार याबाबत गंभीर होईल का, की पुणेकरांना मद्यपी, ड्रगिस्ट लोकांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा, असा सवाल केला जात आहे.
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया...माझ्या सुरक्षेच्या गाडीवर ते धडकले, माझी गाडी पास झाली. आता याला गृहमंत्री काय करणार, काय गृहमंत्र्यांनी तिथे येऊन बोलायला हवे, दादांची गाडी चाललीय तिला कोणी टक्कर देऊ नका. पण मग घटना घडल्यानंतर काय, पकडले दोघांना, त्या तिघींनाही धरून आणले. ते आता पोलीस स्टेशनमध्ये आहेत. आता पोलीस स्टेशनने गडबड केली. गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. पुण्यात चाललेय काय, धाक निर्माण होणार की नाही, असा सवाल करत धाक निर्माण होणे वेगळा विषय आणि घटनेनंतर कारवाई होणे वेगळा विषय आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.