ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - दुबईहून पुण्यामध्ये आणण्यात आलेले तस्करीचे तब्बल ९ किलो सोने केंद्रिय सिमाशुल्क विभागाने पकडले असून स्पाईट जेट विमानाच्या शौचालयात २ कोटी ८० लाखांची सोन्याची बिस्किटे आढळून आली होती. लोहगाव येथील पुणे विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.
सिमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून पुण्यात येत असलेल्या स्पाईस जेट कंपनीच्या ‘एसजी-५२’ या विमानामध्ये तस्करीचे सोने असल्याची माहिती सिमा शुल्क विभागाला मिळाली होती. हे विमान पहाटे चारच्या सुमारास विमानतळावर उतरल्यानंतर अधिका-यांनी विमानामध्ये तपासणी सुरु केली. तपासणी दरम्यान शौचालयाच्या भांड्यामध्ये एका प्लास्टीक पिशवीत लपवून ठेवलेली सोन्याची दहा बिस्कीटे आढळून आली. या बिस्कीटांचे वजन ९ किलो १०० ग्रॅम असून त्याची बाजारपेठेतील किंमत २ कोटी ८० लाख रुपये आहे. पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसात तस्करीचे सोने पकडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यातच विमानतळावर एक कोटी रुपयांचे ड्रोन कॅमेरे सिमा शुल्क विभागाने जप्त केले होते. पुणे विमातळावर तस्करीचे सोने पकडण्याची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सीमा शुक्ल विभागाचे उपायुक्त के. शुभेंद्र यांनी सांगितले.