पुणे : पासपोर्ट अर्ज स्वीकारणे व पासपोर्ट देण्यात पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालय देशात तिसऱ्या स्थानावर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महानगर नसलेल्या शहरांमध्ये पहिल्या स्थानावर कोझीकोडे, त्यापाठोपाठ ठाणे आणि त्यानंतर पुण्याने तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच, देशात सर्वाधिक पासपोर्ट देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्रही तिसऱ्या स्थानावर आहे.पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयामध्ये पासपोर्टसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या मागील ५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दर वर्षी त्यामध्ये १० टक्क्यांची वाढ होत आहे. सातत्याने भरविण्यात येणारा पासपोर्ट मेळावाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कार्यालयाने २०१३मध्ये सुमारे २ लाख जणांना पासपोर्ट दिले. तर, २०१२मध्ये हा आकडा ८० हजार एवढा होता. पासपोर्ट देण्यात होत असलेली वाढ कार्यालयाला देशात तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पुणेवासीयांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांचे जीवनमान उंचावत आहे. त्याचबरोबर, शहरात शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांचा विकास वेगाने होत आहे. तत्काल पासपोर्ट देण्यातही पुण्याने तिसरे स्थान पटकावले असून, कोझीकोडे आणि तिरुअनंतपुरम अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. देशात सर्वाधिक पासपोर्ट देण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर कार्यालयांनी दिलेल्या पासपोर्टमुळे महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले आहे. (प्रतिनिधी)पासपोर्ट अधिकारी अतुल गोत्सुर्वे म्हणाले, ‘‘मागील एक दशकापासून जेवढे अर्ज प्राप्त होत आहेत, त्यांमध्ये दर वर्षी दुप्पट वाढ होत आहे. पुणे फक्त शिक्षणाची राजधानी नसून, आयटी आणि उद्योग हबही आहे. मोठ्या शहरांतील लोकांना पुण्याचे आकर्षण आहे. त्याबरोबर परराज्यांतून नोकरीनिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. परदेशात जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना पासपोर्ट मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.’’
पासपोर्ट देण्यात पुणे देशात तिसरे..!
By admin | Published: April 19, 2015 12:55 AM