पुणे : वाघोली येथील साई सत्यम परिसरात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना रंगेहात पकडण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल व माऊली कुलथे यांनी दोघांना रंगेहात पकडले असून अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
रिशी चंदेश्वर शर्मा वय २९ व गणेश नीचंद्र ठाकुर वय १९ दोघं रा. दत्तमंदिराजवळ, लोहगाव रोड, मुळगाव बिहार असे एटीएम फोडणा-या दोघांची नावे असून एटीएमच्या बाहेर पाळतीवर असणारा विजय रामचंद्र कदम रा.(पवारवस्ती) हा फरार झाला आहे. साई सत्यम परीसरात रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शटर बंद करून एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती रात्र गस्तीवर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यांनी तात्काळ तक्रार करणार्या व्यक्तिशी संपर्क साधून एटीएम समोर आले होते. त्याचबरोबर बीटमार्शलला ही याबाबत कळविण्यात आले. शटर बंद व चोरट्यांकडील शस्त्रे याबाबत अनभिज्ञ असल्याने तोरडमल व चालक माऊली कुलथे यांनी धाडस करत शटर खोलून दोघांना रंगेहात पकडले. पोलिस व चोरट्यांमधे धरपकडही झाली होती. यानंतर बीट मार्शल मधील अमोल लांडगे, हिमराज जगताप चोरट्यांना पकडण्यासाठी दाखल झाले होते. दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पाळत ठेवणा-या विजय कदम याचा शोध पोलीस घेत आहेत. लोणीकंद पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईने ग्रामास्थांकडून कौतुक होत आहे.