Pune porsche accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मद्यप्राशन करुन अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची देशपातळीवर देखील दखल घेतली जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारण देखील सुरु झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेविषयी रोष व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. तर या प्रत्युत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी हे मतांचे राजकारण करत आहेत, असं म्हटलं आहे.
रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर काहीवेळात जामीन मिळाला. कोर्टाने जामीन देताना काही अटी ठेवल्या होत्या. त्यावरुन लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका देखील केली. राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत मोदींना दोन भारत हवे आहेत म्हणत सरकारला घेरलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"या घटनेचे राजकारण करण्याचा हा चुकीचा प्रकार आहे. कारण पुण्यातील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र पोलिसांनी त्याविरोधात अपील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलाला दारू पाजणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. मी त्याचा निषेध करतो. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं?
"दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं होतं.