पुणे : कोट्यवधी रेल्वे प्रवाशांच्या सेवेत गेली ९१ वर्षे कार्यरत असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांसह पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादभोय यांच्या हस्ते केक कापण्यात आला.रेल्वे प्रवासी ग्रुपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर, वरिष्ठ परिचालक प्रबंधक अशोककुमार तिवारी, वरिष्ठ स्टेशन प्रबंधक ए. के. पाठक, जेआरपीएफचे मुख्य पोलीस निरीक्षक श्रीसागर, रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा, सचिव मिलिंद शेडगे, केडगाव रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष दिलीप कोळकर आणि रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांतील नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती आणि दीड वर्षांपूर्वी लागलेली भीषण आग या घटना पचवीत आजही ही इमारत दिमाखात उभी असून, प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. कार्यक्रमादरम्यान दादभोय यांनी प्रवासी आणि प्रवासी गु्रपच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, इमारतीच्या देखभाल आणि सुधारणांबाबत अनेकांची मते जाणून घेतली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांचादेखील विचार सुरू आहे. देशात अनेक अशी मोठी व पुरातन मंदिरे आहेत, ज्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. त्याच पद्धतीने या वास्तूची निगा राखण्यात यावी. त्यासाठी राजस्थानमधील वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण तेथील अनेक कारागीर अशा वास्तूंची देखभाल घेण्यात माहीर आहेत. त्यामुळे येथील ऐतिहासिकपणा कायम राहील आणि गरजेचे ते बदल देखील होतील. तसेच इमारतीच्या समोर लेजर लाईटिंग करण्यात यावी. त्याद्वारे या इमारतीवर १२ महिने झगमगाट राहील, अशी मागणी या वेळी हर्षा शहा यांनी दादभोय यांच्याकडे केली.
पुणे रेल्वे स्टेशन@91
By admin | Published: July 28, 2016 4:13 AM