पुणे : शहरात अमलीपदार्थांचे जाळे पसरत चालले असून आता या ‘ड्रग डीलिंग’मध्ये नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील उतरू लागल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने रविवारी संध्याकाळी केलेल्या कारवाईमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी विमानतळ परिसरातून एक लाख नऊ हजारांचे मेफेड्रोन आणि एक आलिशान मोटारही जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे वडील उत्तर प्रदेशात वन विभागाचे बडे अधिकारी आहेत. प्रखर रमेश चंद्रा (वय २३ रा. कल्याणी नगर) व मोहन मल्लप्पा गौडगीरी (२० रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रा मेफेड्रोनच्या विक्रीसाठी विमाननगरमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावला. एका आलिशान मोटारीमधून अमली पदार्थ्यांच्या विक्रीसाठी आलेल्या चंद्रा आणि गौडगिरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ १८.२०० मिली ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळला. पोलिसांनी मोटारही जप्त केली आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाने त्यांच्याकडून ५ लाख ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पुण्यातील विद्यार्थी ‘ड्रग डीलर’!
By admin | Published: November 08, 2016 4:45 AM