पुणे, दि. 10 - नैराश्यामधून एका डॉक्टर महिलेने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कोंढव्यातील साईनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
डॉ. इंदुमती शाम डोंगरे (वय 40, रा. सुखसागरनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरे या बीएचएमएस डॉक्टर होत्या. त्यांचे पती शाम हे सुद्धा डॉक्टर असून या दोघांचे साईनगरमध्ये गजानन क्लिनिक नावाचे रुग्णालय आहे. त्यांना दोन मुले आहेत. डोंगरे यांना नैराश्याचा (डिप्रेशन) आजार होता. महाविद्यालयीन जिवनापासूनच त्यांना हा आजार होता. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन आणि उपचार घेत होत्या.
मात्र, मागील 8-10 दिवसांपासून त्यांना अधिकच त्रास होऊ लागला होता. गुरुवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी खाली उडी मारली. आरडाओरडा झाल्यानंतर त्यांच्या पतीने बाहेर येऊन हा प्रकार पाहिला. डोंगरे यांना तातडीने बिबवेवाडीमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पतीनेच पोलिसांना दुरध्वनीवरुन घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली. पोलिसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.