सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्सचे वाटप केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दिले होते़ त्यानुसार मंगळवारी सोलापूर शहर पोलीस दलातील जेलरोड पोलीस ठाण्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य दोघा महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाची फिर्याद महापारेषण व्यवस्थापक व भरारी पथक क्रमांक ६ चे प्रमुख ईश्वर मल्लिनाथ गिडवीर यांनी दिली आहे़ याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार हे करीत आहेत.
याबाबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी तक्रार दाखल केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी साडेबारा ते एक या काळात मेकअप बॉक्सचे वाटप केले, अशी तक्रार आडम मास्तर यांनी केली. विधानसभानिवडणूक घोषित होताच, निवडणुकीचा कार्यक्रम व तयारीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला आडम मास्तर उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर विडी घरकूलमधील एका महिलेने आणून दिलेला मेकअप बॉक्स आडम मास्तर यांनी जिल्हाधिकाºयांना दाखविला. त्या बॉक्सवर आमदार प्रणिती शिंदे यांचे छायाचित्र आहे. याबाबत लेखी तक्रार द्या, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. त्याबाबत आडम मास्तर यांनी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीबाबत जिल्हाधिकाºयांनी आमदार शिंदे यांच्याकडे खुलासा मागितला होता. त्यावर आमदार शिंदे यांनी दिलेल्या खुलाशात हे मेकअप बॉक्स गणेशोत्सवात वाटप केल्याचे स्पष्ट केले असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंमल सुरू असल्याने हे मेकअप बॉक्स कधी वाटप झाले याचा तपास होणे गरजेचे असल्याने हे प्रकरण पोलिसांकडे देण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़