ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 - पुणे शहर स्वच्छतेच्या बाबतीत जरी देशामध्ये तेराव्या स्थानावर गेले असले तरी आॅनलाइन वीजबिल भरणा करण्यात मात्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणेकरांनी महावितरणच्या संकेतस्थळ तसेच मोबाईल अॅपद्वारे गेल्या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 1 हजार 194 कोटींचा आॅनलाइन भरणा केला आहे. पुणे परिमंडलातील 66 लाख 50 हजार वीजग्राहकांनी हा विक्रम केला आहे.महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी संकेतस्थळावर आॅनलाइन बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. यासोबतच जून 2016मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाइल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. अनेक नागरिकांनी हे मोबाईल अॅप डाऊनलोड करून घेतले आहे. या अॅपद्वारे आपण मीटर रीडिंगचा फोटो काढून अपलोड केल्यास मोबाईलवरच वीजबिलही आगामी काळात मिळणार आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये महावितरणच्या अधिका-यांची बैठक घेतली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी मोबाईल अॅपचा वापर वाढवण्यावर भर देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. कमीत कमी मनुष्यबळात कसे काम करता येईल याचा विचार करून अॅपचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले होते. या मोबाईल अॅपचा तसेच संकेतस्थळांचा वापर करून तब्बल 66 लाख 50 हजार ग्राहकांनी 1 हजार 194 कोटींचे वीज भरुन देशामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांचे बिल भरण्याचीही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणे परिमंडलात सन 2015-16च्या तुलनेत आॅनलाइन वीजबिल भरण्यामध्ये 2016-17 या वर्षात 333 कोटी 29 लाख रुपयांनी तर ग्राहकसंख्येत 19 लाख 15 हजारांनी वाढ झालेली आहे.
पुणेकरांनी भरला 12 कोटींचा आॅनलाइन भरणा
By admin | Published: May 09, 2017 9:07 PM