- अभय नरहर जोशी निम्म्या पुणेकरांनीमतदानाकडे पाठ फिरवली तर अखिल भारतात केवढा हलकल्लोळ जाहला. पुण्यात जे होतं ते अखिल भारतीय स्तरावरचं असतं म्हणा. त्याला ही घटना तरी अपवाद कशी ठरणार. पुणेकरांनी असे का केले, असा जाब समाजमाध्यमांच्या चव्हाट्यावर विचारला जाऊ लागला. दुपारी एक ते चार पुणेकर काहीही करत नाहीत, ५० टक्के मतदान करणारे पुणेकर जगाला १०० टक्के शहाणपण शिकवतात वगैरे वगैरे... अशी खिल्ली उडवली जात आहे. तसे आम्ही बाटगे पुणेकर. (बाटगे जास्त कडवे असतात... या न्यायानं आम्ही कडवे पुणेकर आहोत. खरे पुणेकर आम्हाला नावं ठेवतात, हा भाग वेगळा) जन्मभूमी नसली तरी पुणे ही आमची कर्मभूमी. आम्हीही पुणेकरांनी असे का केले, याची कारणे शोधली, अनेक पुणेकरांशी बोललो... यामागची काही प्रातिनिधिक कारणे आम्हाला सापडली, ती अशी...त्येक विषयावर पुणेकरांचं मत असतंच, हे जरी खरं असलं तरी अस्सल पुणेकर आपलं खरं मत राखून ठेवतात. त्यामुळे मत न देता राखून ठेवणारे निम्मे पुणेकर हे अस्सल असावेत. निम्मे हे बाहेरून आलेले व येथे स्थायिक झालेले ‘रूपांतरित पुणेकर’ असावेत. २. मतदान केंद्रावर आम्ही जाण्यापेक्षा मतदान अधिकाºयांनी जर घरी ईव्हीएम आणून आमचे मत गुपचूप नोंदवून घेतले, तर खरे गुप्त मतदानाचे तत्त्व पाळले जाईल. शेवटी हा प्रश्न तत्त्वाचा आहे, असेही काही पुणेकरांनी ठामपणे सांगितले. ३. मतदानाच्या दिवशी शेक्सपिअरचा जन्मदिन होता. परंपराप्रिय पुणेकर परंपराप्रिय ब्रिटिशांप्रमाणेच शेक्सपिअरप्रेमी असल्याने, मतदानाच्या बाबतीत ‘टु बी आॅर नॉट टु बी’ अशा द्विधा मन:स्थितीत होते. ‘नावात काय आहे,’ या शेक्सपिअरच्या वचनावर श्रद्धा असलेल्या अनेक पुणेकरांनी आपली मतदार नावनोंदणीच केली नव्हती.४. हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा केला जात असल्याने आणि अनायासे सुटी मिळाल्याने हापूस-पायरीचा आमरस चापल्यानंतर काही पुणेकर पुस्तक वाचनानंदात रममाण होऊन गेले. थोड्या वेळानं काही एवढे रममाण झाले, की त्यांनी आपला चेहराच त्या पुस्तकात खुपसून घेतला आणि वाचनानंदाचे अगम्य आनंदोद्गार ते काढू लागले. (याबाबत त्यांच्या ‘घरच्यां’चे जरा दुमत आहे. या वाचनसमाधीचे वर्णन त्यांनी ‘गाढ वामकुक्षीतील घोरणे’ असे करून या आनंदाला शारीर पातळीवर आणून ठेवले, असो)... अशा या सर्व प्रकारांत मतदान वगैरे करणे राहूनच गेले. ५. ‘जोशी’ आणि ‘बापट’ या दोन प्रमुख उमेदवारांची नावे अगदीच ‘पुणेरी प्रतिनिधित्व’ करणारी असल्यानं आपलं प्रतिनिधित्व नेमकं कुणाला द्यावं बरं, याबाबत दुमत झाल्यानं आणि मत मात्र एकच द्यायची तरतूद असल्यानं काही पुणेकरांनी नाईलाजानं मतदान न करणं पसंत केलं. ६. सर्वत्र उन्हाळा असला तरी पुण्याचा उन्हाळा अंमळ अधिकच असतो. त्यामुळे तब्येत बिघडेल, या भीतीनं अनेक ‘हेल्थ कॉन्शियस’ पुणेकर घराबाहेर पडले नाहीत. ७. मतदार केंद्रापर्यंत जाऊन मतदान करणे म्हणजे ‘टू ओल्ड फॅशन’ असे म्हणून काही हायटेक पुणेकरांनी नाकं मुरडली. ‘पेटीएम’, ‘फोन पे’प्रमाणे मतदानाचं अॅप असावं, म्हणजे सर्व कसं ‘वोटर फ्रेंडली’ होईल. ते होईपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असं सांगून बºयाच जणांनी मतदानाकडे पाठ फिरवली. ८. चितळे, काका हलवाई, जोशी स्वीट्स, मॅक्डोनल्ड येथे, तसेच मतदानाचा वार मंगळवार होता. या दिवशी देवी मंदिरांपाशी मतदानाची सोय केली असती तर कामात काम झाले असते, असेही काही पुणेकरांचं ‘मत’ पडलं.९. मतदानाचा हक्क कर्तव्याप्रमाणे बजावायलाच हवा, अशा जाहिरातींचा वारंवार मारा झाल्यानं काही पुणेकर संतापले. ‘आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे कोण?’ असा सवाल करून आम्ही जर मतदान केलं नाही तर ते घटनाबाह्य कृत्य ठरत नाही, असे काही स्वयंघोषित राज्यघटनातज्ज्ञ पुणेकरांनी विविध दाखले देत स्पष्ट केले. आम्हाला कोणीही उपदेश द्यायचे नाहीत. तो आमचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.१०. ‘आम्ही मतदान का केलं नाही, यावर आमचं मत विचारणारे तुम्ही कोण?’ असा सवाल करत काही पुणेकरांनी आमच्या तोंडावर धाडकन् दार बंद करून घेतलं! असो
अल्प मतदानाविषयीची पुणेकरांची ‘मते’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 7:14 PM