कमल सोसायटीतील शिवशाही बंगला रिनोवेट केलाय. कमलाकर पंत आणि शिवानी वहिनींना पुन्हा नव्यानं तिथं राहायला जायचंय. मोजक्या जवळच्या लोकांना निमंत्रण देऊन छोटं गेट टु गेदर करायचं ठरलंय. त्या वेळी झालेला घरगुती प्रेमळ संवाद आम्ही (नेहमीच्या भोचकपणे भिंतीला कान देऊन ऐकला) तो खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी देत आहोत. चाणाक्ष वाचकांनी हे गॉसिप म्हणून वाचावे अन् सोडून द्यावे. पण कुणाला सांगू नये. शप्पथ आहे तुम्हाला. वाचा तर मग...शिवानीवहिनी : अहो ऐकलंत का?कमलाकरपंत : (मुद्दामहून दुर्लक्ष करून पेपरमध्ये डोकं खुपसून बसतात) वहिनी : अहो, किती दिवस राहिलेत आता. आपल्याला कुणाकुणाला बोलवायचं त्यांच्या नावाच्या याद्या ठरवाव्या लागतील.पंत : (त्रासिकपणे) कसल्या याद्या? आमचं ठरलंय. वहिनी : अहो सगळ्या निमंत्रितांच्या याद्या ठरवाव्या लागतील ना! अन् काय हो, आमचं काय ठरलंय... हे ठरवणारे आम्ही कोण?पंत : (सावरत) आम्ही म्हणजे मी. मीच सारं ठरवणार. मीच माझी जास्त माणसं घेऊन येणार.वहिनी : अहो, बरे आहात ना? परवाच राज्याची भलीमोठी टूर संपवून आल्यानंतर अशी टूरटूर करू लागला आहात. शिणवट्यानं असं होतंय का? तुमचीच माणसं जास्त का? माझी माणसं का नाही?पंत : मीच पुन्हा सगळीकडे जाऊन सगळ्यांना आग्रहानं बरोबर घेऊन येणार. मीच तुझ्या घरच्यांच्या याद्याही ठरवणार. वहिनी : (फुरंगटून) धंद्यात मार खावा लागल्यानं माझ्या माहेरची पडती बाजू आहे. नाय तर तुम्ही चळचळा कापत होता माझ्या वडिलांना. असल्या कार्यक्रमांनाही आमचीच माणसं जास्त असायची. काय करायचं, काय नको हे वडिलांना विचारल्याशिवाय ठरायचं नाही. त्यासाठी सारखं तुम्हाला आमच्या घरीच जावं लागायचं. वडील गेले नि सारी रया गेली. पंत : (समजूत काढत) तसं नाही गं. सहा महिन्यांपूर्वी नव्हतो का तुझ्या घरी आम्ही गेलो? वहिनी : ते काही नका सांगू. तुम्हाला मोठा लॉस होेण्याची भीती होती म्हणून तुम्ही पडतं घेत घासले उंबरे माझ्या माहेरचे.पंत : अगं, खूप सहन केलं गं तुला नांदवताना... तू किती टोमणे मारलेस. सोडचिठ्ठी द्यायची धमकी दिली. तुझं माझं जमेना. आपले संबंध तोडण्यासाठी तर चक्क तुझ्या घरचे सगळेच सोडचिठ्ठ्या खिशात ठेवून फिरत होते. वहिनी : दिली का सोडचिठ्ठी?... सांगा ना, दिली का? (फणकाºयानं) मी आहे म्हणून संसार चाललाय तुमचा. खूप सहन केली तुमची थेरं. पंत : काही सांगू नकोस. केवढा थयथयाट करायचीस तू! ते सहन होत नव्हतं आणि कुणाला सांगताही येत नव्हतं गं. खरं तर मी आहे म्हणून तुला नांदवतोय. जमत असेल तर रहा... नाही तर...वहिनी : (रडत) नाही तर काय... सांगा ना नाही तर काय? माझं मेलीचं नशीबच खोटं. माझ्या घरच्यांमुळे तुमचा जम बसला. आता तुमची बाजू वरचढ झाली तर लगेच बाहेरचा रस्ता दाखवता का मला? लक्षात ठेवा, स्वाभिमानी घराणं आहे आमचं. फार धमकी दिलीत तर जाईन सोडून कायमची...पंत : (परिस्थिती हातबाहेर जात आहे, हे उमगून...सावरत, समजुतीच्या स्वरात) अगं तसं नाही गं. ऐक जरा. अशी जवळ येऊन बस. माझी अडचण झालीय. बिझनेस वाढवताना अनेकांशी कॉन्टॅक्ट वाढवावे लागतात. त्यामुळे माझी माणसं जरा जास्त येतील. जरा माझी अडचण समजून घे.वहिनी : पण त्यामुळे माझ्या माहेरच्या माणसांची टर उडवली जातेय त्याचं काय. सारखं घालून पाडून बोललं जातंय शेजारीपाजारी.पंत : जाऊ दे गं, दुर्लक्ष करायचं. आपल्या संसारात बिब्बा घालण्यासाठी बसलेत सगळे कावळे.वहिनी : मग कसं करायचं, कोण कोण बोलवायचं, आता किती दिवस राहिलेत. ठरवा ना.पंत : अगं हे दिवस कावळ्यांचे आहेत. आता नको ठरवायला इतक्यात...वहिनी : म्हणजे...?पंत : अगं पितृपक्ष चालू आहे ना. म्हणजे कावळ्यांचेच दिवस. तो संपला की घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठरवू की याद्या आणि उडवून देऊ बार...आता खूश का?... ये की जवळ जरा.वहिनी : (डोळे मिचकावत) ‘कावळ्यांचे दिवस’ सुरू आहेत विसरू नका.
- अभय नरहर जोशी-