ऑनलाइन लोकमत
वाशिम : एका पाठोपाठ दरोडेखोरांनी मालेगाव शहरात दरोडे टाकून मौज केली असतांना रात्रभर नाकाबंदी करुन पोलिसांना मात्र सजा मिळाली.
जिल्हयातील मालेगाव शहरात एका पाठोपाठ दोन दिवस सतत दरोडे टाकून एकप्रकारे पोलिसांना दरोडेखोरांनी आव्हान केले आहे. मंगळवारच्या रात्री टाकलेल्या दरोडा घटनेची शाई वाळत नाही; तोच पुन्हा एकदा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून गुरूवारच्या रात्रीदरम्यान मालेगाव शहरातील तीन ठिकाणी दरोडा टाकून रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करुन पोबारा केला. मंगळवारी दरोडयानंतर नेहमीप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी, पंचनामे केले पण लगेच गुरुवारी पुन्हा दरोडा टाकल्याने अख्खे पोलीस प्रशासन जागे झाले. अन १२ आॅगस्ट रात्रीपासून ते १३ आॅगस्ट पहाटेपर्यंत जिल्हयात नाकाबंदी करण्यात आली. वाशिम शहरातील मुख्य चौकासह जिल्हयात सर्वत्र रात्रभार वाकाटाकी खणखणतांना दिसून आले. बिट मार्शलव्दारे संपूर्ण शहरात रात्रभर गस्त करण्यात आली. यावेळी वाशिम पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी रस्त्यावरुन धावणाºया वाहनांची नोंद होत आहे की नाही याची सुध्दा पाहणी केली. येथील सर्वात जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी पोलीस उपनिरिक्षक नम्रता राठोड यांच्यासह पोलीस शिपाई, शहर वाहतूक शाखेचे २० ते २५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रत्येक गाडीची रात्री उशिरापर्यंत येथे चौकशी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही रात्रभर जिल्यात फिरलेत.