मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शून्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency & daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिका-यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ आणि चकाचक करावीत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. मिशन अंत्योदय अंतर्गत हे अभियान एक ते पंधरा ऑक्टोबरदरम्यान राबविले जाणार असले तरी अनेक जिल्हा परिषदांनी आधीच जुन्या फायलींची आणि फायलींनी भरलेली कपाटे, गोदामांची साफसफाई सुरू केल्याने हे अभियान गतिमान झाल्याचे दिसत आहे.
स्वच्छता अभियान राबवताना आधी आपली कार्यालये स्वच्छ असणे गरजेची आहेत. त्यामुळे कार्यालयातील साचलेल्या फायली, अनावश्यक फायलींची गोदामे, कपाटे खाली करून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासूनच करावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना केले होते. त्यानुसार मिशन अंत्योदय अंतर्गत हे अभियान सध्या राज्यभरात राबविण्यात येत आहे.शून्य प्रलंबिततेचे धोरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, नागरिकांच्या सनदेअंतर्गत कोणते टपाल किती दिवसांत निकाली काढायचे याचे कॅलेंडर ठरविण्यात आले आहे. शिवाय ग्रामविकास विभागाच्या अनेक योजनांना सेवा हक्क कायदा लागू असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे लोकांना निश्चित वेळेत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शून्य प्रलंबिततेचे धोरण अवलंबून ग्रामविकासच्या सर्व अधिका-यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शासकीय कार्यालयात पाठपुरावा केल्याशिवाय कोणतेही काम तत्परतेने होत नाही, अशी सामान्य जनतेची नेहमी तक्रार असते. हे बदलणे आवश्यक असून, यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झिरो पेंडन्सीची सवय लावणे आवश्यक आहे. यासाठीच ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हे शून्य प्रलंबितता व दैनिक निर्गती अभियान राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात आला आहे. सर्वांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तशा सूचनाही त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. जुने कालबाह्य रेकॉर्ड निर्गत करण्याच्या बाबतीत पुणे विभागाने चांगले काम केले असून, या विभागातील कार्यालयांची पूर्वीची स्थिती आणि स्वच्छता केल्यानंतरची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच व्हिडीओ हे दिशादर्शक म्हणून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.व्हॉटस्अॅपवरून मंत्री घेतात दैनंदिन आढावायाशिवाय या अभियानाच्या दैनंदिन आढाव्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन करण्यात आला असून, त्यावर मंत्री पंकजा मुंडे या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आपले कार्यालय स्वच्छ असल्यास त्यात काम करताना आपल्यालाच प्रसन्न वाटते. शिवाय लोकांची कामे निश्चित वेळेत पूर्ण झाल्यास तेही समाधानी होतात. त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.