बंगळुरू : डेव्हिड मिलरच्या (६६ धावा, २९ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार) आक्रमक अर्धशतकी खेळीनंतर संदीप शर्माच्या (३-२५)अचूक मार्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा ३२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात सातवा विजय मिळवून गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले. रॉयल चॅलेंजर्सचा हा पाचवा पराभव ठरला. बँगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हनने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९८ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळणार्या बँगलोर संघाचा डाव २० षटकांत ९ बाद १६६ धावांवर रोखला. लक्ष्याचा पाठलाग करताना बँगलोर संघाची सुरुवात निराशाजनक झाली. आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल (४) झटपट माघारी परतला. विराट कोहली (०) पुन्हा एकदा खाते उघडण्यात अपयशी ठरला. पार्थिव पटेल (१३), सचिन राणा (१८) व युवराजसिंग (३) यांना मोठी खेळी करता आली नाही. संघाची ५ बाद ५० अशी नाजूक अवस्था झाली होती. एबी डिव्हिलियर्सने (५३ धावा, २६ चेंडू, १ चौकार,५ षटकार) एकाकी झुंज दिली; पण त्याला दुसर्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. मिशेल स्टार्क (२९), वरुण अॅरोन (नाबाद १७) व अॅल्बी मोर्केल यांची कामगिरी पराभवातील अंतर कमी करणारी ठरली. त्याआधी, डेव्हिड मिलरचे (६६ धावा, २९ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार) अर्धशतक आणि वीरेंद्र सेहवाग (३०), मनदीपसिंग (२१), रिद्धिमान साहा (१७) व मिशेल जॉन्सन (नाबाद १६) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दमदार धावसंख्येची मजल मारली. वीरेंद्र सेहवाग व मनदीपसिंग यांनी ३५ चेंडूंमध्ये ६० धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. ग्लेन मॅक्सवेलने १० चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी केली. त्यात २ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. चहलने २३ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
किंग्ज इलेव्हन पंजाब :- वीरेंद्र सेहवाग झे. कोहली गो. चहल ३०, मनदीपसिंग झे. मोर्केल गो. पटेल २१, ग्लेन मॅक्सवेल झे. स्टार्क गो. चहल २५, डेव्हिड मिलर झे. चहल गो. अॅरोन ६६, जॉर्ज बेली झे. पार्थिव गो. मोर्केल ०१, रिद्धिमान साहा झे. डिव्हिलियर्स गो. पटेल १७, मिशेल जॉन्सन नाबाद १६,अक्षर पटेल त्रि. गो. स्टार्क २, शिवम शर्मा त्रि. गो. स्टार्क ४, लक्ष्मीपती बालाजी नाबाद १. अवांतर (१५). एकूण २० षटकांत ८ बाद १९८. बाद क्रम : १-६०, २-६८, ३-९३, ४-११६, ५-१७०, ६-१८४, ७-१८९, ८-१९३. गोलंदाजी : स्टार्क ४-०-४३-२, मोर्केल ४-०-२०-१, अॅरोन ४-०-३५-१, पटेल ३-०-५६-२, चहल ४-०-२३-२, युवराज १-०-१९-०. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर :- ख्रिस गेल झे. साहा गो. संदीप शर्मा ४, पार्थिव पटेल झे. मनदीपसिंग गो. संदीप शर्मा १३, विराट कोहली झे. साहा गो. संदीप शर्मा ०, सचिन राणा त्रि. गो. पटेल १८, एबी डिव्हिलियर्स झे. पटेल गो. बालाजी ५३, युवराजसिंग झे. सेहवाग गो. शिवम शर्मा ३, अॅल्बी मोर्केल झे. बेली गो. शिवम शर्मा १६, मिशेल स्टार्क झे. मिलर गो. बालाजी २९, हर्षल पटेल झे. साहा गो. जॉन्सन ६, वरुण अॅरोन नाबाद १७, यजुवेंद्र चहल नाबाद १. अवांतर : ६. एकूण : २० षटकांत ९ बाद १६६. बाद क्रम : १-८, २-८, ३-२६, ४-३९, ५-५०, ६-७६, ७-१२५, ८-१३३, ९-१५३. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-२५-३, मिशेल जॉन्सन ४-०-२५-१, लक्ष्मपती बालाजी ३-०-४३-२, अक्षर पटेल ४-०-२२-१, शिवम शर्मा ४-०-२६-२, ग्लेन मॅक्सवेल १-०-२४-०.