जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता पुरंदर तालुक्यातील विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारीही उतरले असून गावोगावी ग्रामस्थांच्या बरोबरीने त्यांनीही हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदान केले. तालुक्यातील एकूण १२ गावांतून मंगळवारी महाश्रमदान घेण्यात आले होते. पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे ३३ गावांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. यापैकी साकुर्डे, मावडी क.प., आंबळे, वाघापूर, हिवरे, चांबळी, पोखर, केतकावळे, पांगारे, हरणी, मांढर, धनकवडी या गावातून काल दि. २ मे रोजी या गावातून शासनाच्या विविध विभागांनी ग्रामस्थांसमवेत महाश्रमदान करण्याचे नियोजन प्रांताधिकारी संजय आसवले व तहसीलदार सचिन गिरी, तसेच पाणी फाउंडेशनचे पुरंदर समन्वयक सुरेश सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाकडे एक गाव देण्यात आले होते. साकुर्डे येथे महसूल विभागाचे नायब तहसीलदार धनंजय जाधव, संजय काटकर यांच्यासह सर्व तलाठी व कर्मचारी ग्रामस्थांसमवेत सकाळपासून श्रमदान करीत होते. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी पवार आणि त्यांचे पती माजी सदस्य शिवाजी पवार यांनीही ग्रामस्थांसह श्रमदानात भाग घेतला होता. या वेळी श्री. पवार यांनी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठे काम उभे केले आहे. मीही वैयक्तिक अथवा इतर ठिकाणांहून या कामासाठी मदत करणार असल्याचा शब्द ग्रामस्थांना दिला. साकुर्डे गावच्या सरपंच तृप्ती जगताप यांनी आपला वाढदिवस ग्रामस्थांसमवेत श्रमदान करूनच साजरा केला. मावडी क. प. येथे जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह जेजुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी संजय पाटोळे यांच्यासह या विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही श्रमदानात भाग घेतला होता. जेजुरी पोलीस ठाण्याकडूनच श्रमदानात सहभागी ग्रामस्थांसाठी अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. चांबळी येथे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. तसेच सामाजिक वनीकरणाचे अधिकारी दीपक पवार व कर्मचारीही येथील श्रमदानात सहभागी झाले होते. हिवरे येथे पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह पुरंदर पंचायत समितीचे कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले होते. मांढर येथे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसह श्रमदान केले. आंबळे यथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. के. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. हरणी येथील महाश्रमदानात पुरंदरचा वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एन. दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. वाघापूर येथे सहकार विभागाच्या वतीने श्रमदानात सहभाग घेतला होता. पुरंदरचे सहायक निबंधक सतीश ढमाळ व सर्व कर्मचारी यात सहभागी झाले होते. पोखर येथे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह कमाचाऱ्यांनी श्रमदानात भाग घेतला, तर जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी कर्मचाऱ्यांसह पांगारे ग्रामस्थांसह श्रमदान केले. केतकावळे येथे पुरंदर भूमी अभिलेखचे बाळासाहेब भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत श्रमदान केले. ज्या ज्या गावात श्रमदान करण्यात आले तेथील रेशनिंग दुकानदारांकडून श्रमदात्यांना अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. (वार्ताहर)काल एका दिवसात तालुक्यातील १२ गावांतून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे चार हजारांवर श्रमदात्यांनी तालुका पाणीदार करण्यासाठी श्रमदान करून सहभाग नोंदवला. गावागावात लहान-मोठे सलग समतल चर, दगडी बांध, बांध-बंदिस्ती, जुन्या नाल्यांची दुरुस्ती आदी कामे केली असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते यांनी दिली. येत्या १४ मे रोजी पुरंदर तालुक्यातही छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त महाश्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी गावांनी आपापल्या गावातील उद्योजक, बाहेरगावी राहणारे नातेवाईक यांना या महाश्रमदानात सहभागी करून घ्यावे. यातून जलसंधारणाचे मोठे काम उभे राहणार आहेच, शिवाय मनसंधारणातून गावाच्या विकासालाही चालना मिळेल, असे आवाहन प्रांताधिकारी संजय आसवले यांनी केले आहे. शेटफळगढे : मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांनी निरगुडे (ता. इंदापूर) येथे वॉटर कप स्पर्धेत महाश्रमदान करण्यासाठी हजेरी लावली.सिनेअभिनेते आमिर खान यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत निरगुडे गावाने सहभाग घेतला आहे. यामध्ये पाणीदार गाव बनवून दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही कामे श्रमदानातून केली जात आहेत. याचा भाग म्हणून १ मे महाराष्ट्रदिनानिमित्त आयोजित महाश्रमदान करण्यात आले होते. सकाळीच पाच वाजल्यापासून विशेषत: सिनेमात काम करत असलेल्या कलाकार यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासाठी संयोजक यांनी आखून दिलेले खड्डे कंपार्टमेंट बिल्डिंगची कामे केली. यांच्याबरोबर विविध क्षेत्रातील मोठमोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी आपण कोण आहोत याची जाणीव न ठेवून श्रमदान केले. यामध्ये सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर, सिनेअभिनेते सुनील बर्वे यांचाही समावेश होता, त्याचबरोबर ७९ आणि ७३ वर्षीय मुंबईच्या दोन आजीबाईदेखील आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत श्रमदान केले. हे श्रमदान पहाटेपासून सकाळी आकरा वाजेपर्यंत सुरू होते. श्रमदान करण्यासाठी आलेल्या लोकांना पाणी फाऊंडेशन निरगुडेच्या युवकांनी चहा आणि नाष्टा आणि पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. या श्रमदानातून लाखो लिटर पाणी अडवून जमिनीत जिरेल. त्याचा पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. या वेळी गावचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनीही श्रमदान केले. या कार्यक्रमाचे नियोजन पाणी फाऊंडेशन निरगुडेच्या देवेंद्र राऊत, सागर पानसरे, अमोल चव्हाण, अक्षय पानसरे, रवी पवार, विनोद जगताप, अनिल खाडे, संभाजी गोसावी, योगेश केकाण, भगवान खारतोडे, मयुर रणधीर यांच्यासह अनेक युवकांनी केले. (वार्ताहर)
पुरंदर, इंदापूर तालुक्यात महाश्रमदान!
By admin | Published: May 04, 2017 1:57 AM