सातारा : ‘सध्याच्या राज्यकर्त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी शोधले तर नाहीतच; पण त्यांचे विचार गावागावात जाऊ नयेत म्हणून छत्रपती शिवरायांचा विकृत इतिहास सांगणाऱ्या ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर केला़ याचा अर्थ असा आहे की, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सांगणाऱ्यांना गोळ्या घालायच्या आणि विकृत इतिहास सांगणाऱ्यांचे पुरस्कार देऊन कौतुक करायचे़ हा महाराष्ट्र शासनाने कॉ. गोविंद पानसरे यांचा घडविलेला वैचारिक खून आहे,’ असा आरोप कॉ़ धनाजी गुरव यांनी केला.विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सातारा येथे झाली़ यावेळी ते बोलत होते. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सचिव गौतम कांबळे, उपाध्यक्ष प्रा़ डॉ़ बाबूराव गुरव, विजय मांडके, कार्यकारिणी सदस्य प्रा़ सुधीर अनावले, प्रा़ नामदेव करगणे, प्रा. विजयकुमार जोखे, दीपक कोठावळे, प्राचार्य विश्वास सायनाकर, शिवराम ठवरे आदींची उपस्थिती होती.धनाजी गुरव म्हणाले, ‘महाराष्ट्रातले सध्याचे सरकार हे राष्टीय स्वयंसेवक संघाचे समर्थक असल्याने पुरंदरे यांना जसा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने जाहीर झाला आहे़ या प्रकारचे अनेक निर्णय भविष्यात शासनाकडून घेतले जातील म्हणून आपण सावधपणे त्यांच्या निर्णयांचा अर्थ काय होतो, हे राबणाऱ्या बहुजन समाजाला सांगितले पाहिजे़ पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार याचाच अर्थ कॉ. गोविंद पानसरे यांचा दुसरा खून आहे,’ असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मत असल्याचे कॉ़ धनाजी गुरव यांनी सांंिगतले़ ‘या निर्णयाविरोधात जनतेचा आवाज उठविण्यासाठी व राज्यभर चर्चा घडवून आणण्यासाठी शक्य झाल्यास सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन परिणामकारक कार्यक्रम घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला,’ असे यावेळी गौतम कांबळे यांनी सांगितले़सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लवकरच ‘पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण म्हणजे कॉ. गोविंद पानसरे यांचा दुसरा खून’ या विषयावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर कार्यक्रम घेण्याचे या बैठकीत ठरले़ यावेळी महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
पुरंदरेंना पुरस्कार म्हणजे पानसरेंचा दुसरा खून
By admin | Published: May 24, 2015 10:57 PM