आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क
वसई: राज्य शासनाच्या सफाई मित्र चॅलेंज या कार्यक्रमांतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात स्वच्छतेसाठी मैला टँकरची खरेदी केली असल्याने सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या सफाई मित्र चॅलेंज या स्तुत्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वत: वसई विरार महानगरपालिकेने नुकतेच 5 मैला टँकरची खरेदी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.
एकूणच हाताने मैला सफाई करणे बाबत शासनाने पूर्णतः बंदी आणली आहे. तरी शहरातील कोणत्याही नागरिकांनी त्यांच्या इमारतीच्या, घराच्या किंवा वाणिज्यक इमारतीच्या शौचालयाची टाकी सफाई करणेकरिता कोणत्याही खाजगी सफाई कामगारांना काम देण्यात येऊ नये.आणि अशा प्रकारचे काम करताना आढळल्यास संबंधित काम करून घेणाऱ्या नागरिक अथवा संस्था, संघटना यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.असे ही वारंवार सुचवले आहे.
दरम्यान याकरिता वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील रहिवासी इमारती, वाणिज्य इमारती, स्वतंत्र घरे इत्यादी मधील शौचालयाच्या शौचटाक्या दर दोन वर्षातून एकदा सफाई करणे आवश्यक आहे. आणि त्याकरिता महापालिकेच्या मालकीच्या 4 व कंत्राटी पद्धतीने 2 मैला टॅंकर चालविण्यात येत आहेत. अर्थातच ही वाहने वाढत्या शहरीकरणामुळे अपुरी पडत असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेकडून अतिरिक्त नवीन 5 मैला टॅंकर खरेदी करण्यात आले असून विशेष म्हणजे हे सर्व मैला टॅंकर ट्रॅक्टर माऊंटेड असल्याने दाट लोकवस्ती मधील शौचालये सफाई करण्यास फायदेशीर होणार असल्याचे ही पालिकेन स्पष्ट केले आहे पालिकेच्या या कार्यक्रमाचे सफाई कामगारांनी स्वागत केले आहे.