नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ८६३६ हेक्टर जमीन लागणार आहे. यात ७२९१ हेक्टर खासगी तर १३४५ हेक्टर जमीन शासकीय व वनविभागाची आहे. यातील ५९०६ हेक्टर खासगी जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत शुक्रवारी प्रश्नाच्या उत्तरात दिली.मोबदला निश्चितीकरणासाठी जिल्हास्तरीय समितीने निर्धारित केलेली भरपाईची रक्कम विविध पद्धतीने जमीनधारकाला अदा करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एकूण १६ कन्स्ट्रक्शन पॅकेज करण्यात आलेले आहेत. त्यापैकी १ ते १३ साठी अर्हताप्रक्रिया तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अर्हताप्राप्त १८ अर्जदारांकडून निविदा बोलविण्यात आलेल्या आहेत. प्राप्त न्यूनतम निविदाकाराच्या नियुक्तीला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी उत्तरात दिली. सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे यांनी समृद्धी महामार्गासाठी शासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला का असा प्रश्न उपस्थित केला होता.
समृद्धी महामार्गासाठी ५९०६ हेक्टर जमीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:45 AM