मुंबई : गेल्या काही वर्षांत वीज दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे रेल्वेकडून खुल्या बाजारातून वीज खरेदीचा पर्याय निवडण्यात आला. त्याद्वारे भारतीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयाकडून येत्या काही वर्षांत विजेच्या बिलात बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार स्वस्तातील वीज खरेदीसाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लिमिटेडशी पुन्हा पाच वर्षांचा करार केला आहे. यामुळे पाच वर्षांत एकूण २,५०० कोटी रुपयांची बचत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वेला मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासते. महावितरण आणि अन्य वीज कंपनीकडून रेल्वेला मिळत असलेली ही वीज ९ रुपये प्रति युनिट दराने मिळत असल्याने रेल्वेला महागडी ठरते. त्यामुळे स्वस्तातील वीज खरेदीसाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लिमिटेडशी नोव्हेंबर २०१५मध्ये करार केला. तो मार्च २०१७मध्ये संपला. त्यामुळे पुन्हा पाच वर्षांचा करार केला. यामुळे मध्य रेल्वेला फायदा झाला. त्यामुहे १ एप्रिलपासून पुढील पाच वर्षांसाठी करार करण्यावर भर दिला. रत्नागिरी गॅस पॉवरमधून मिळणारी वीज प्रत्येक युनिटमागे ५.५० रुपये एवढी आहे. त्यामुळे रेल्वेची मोठी बचत होईल. (प्रतिनिधी)
स्वस्त वीज खरेदीमुळे रेल्वेचे २,५०० कोटी वाचणार
By admin | Published: April 07, 2017 5:57 AM