ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला शनिवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची संतानलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाडय़ातील तुळजाभवानीची दाक्षिणात्य रूपात पूजा बांधण्यात आली.
शनिवारी सकाळी अंबाबाईचा शासकीय अभिषेक झाल्यानंतर दुपारची आरती करण्यात आली. त्यानंतर देवीची संतानलक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ‘सुपुत्रदायिन्यै श्रीसंतानलक्ष्म्यै नम: । संतानलक्ष्मि नमस्तेस्तु पुत्रपौत्रदायिनी, पुत्रन् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ।।’ अष्टलक्ष्मीतील पाचवी देवता असलेली संतानलक्ष्मी ही भक्तास संतान देऊन वंशवृद्धी करते. ही पूजा मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, रवी माईणकर यांनी बांधली.
दिवसभरात माउली आध्यात्मिक भजनी मंडळ, सानेगुरुजी भजनी मंडळ, ज्ञानाई सांस्कृतिक मंडळ, पद्मजा कुलकर्णी (पुणे), वीरशैव अक्कमहादेवी भजनी मंडळ, अनिता पाटील याची भावगीते, भक्तिगीते, कामाक्षी शानबाग यांचे भरतनाटय़म्, अनंत तरंग (मिरज) या संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली. अभियंता नेत्रदीप सरनोबत, मनीष पोवार, देवस्थानचे सदस्य राजेंद्रअण्णा देशमुख, हिरोजी परब, डॉ. जयश्री कटारी : उपायुक्त (सेल्स टॅक्स), लालबहादूर कटारी यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले.