राजगुरुनगर : चुकीच्या वृत्तीने वागणाऱ्या भगवान पोखरकरसारख्या लोकांची पाठराखण करण्याचे काम खेड तालुक्यात माजी खासदारांनी कायम केले. भांडणे लावणाऱ्या आढळरावांना तालुका पुन्हा स्वीकारणार नाही. तसेच सभापती भगवान पोखरकर राजकारणातून कायमचे संपले, अशी कडवट टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.
खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनतर झालेल्या स्वागत सभेत मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अरुण चांभारे, शांताराम सोनवणे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती रामदास ठाकूर, सुरेश शिंदे, कैलास सांडभोर, राजाराम लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर, माजी सभापती अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, मयूर मोहिते, विलास मांजरे, सुभाष होले, यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर सदस्य यावेळी उपस्थित होते.
मोहित पाटील म्हणाले, महाआघाडीचे सरकार राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असताना तालुक्यात झालेला बदल आढळराव यांनी वरिष्ठांना चुकीच्या पद्धतीने सांगितला. खरी वस्तुस्थिती लपवली. त्यामुळे गेले तीन महिने सर्व तालुक्याला त्रास झाला. नागरिकांची कामे रखडली. विकास कामांना खीळ बसली. पंचायत समितीच्या सेना सदस्यांना विश्वासात न घेता वादग्रस्त व्यक्तीची पाठराखण करून वाद लावले. पोखरकर हा गुन्हेगार आहे. पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर असताना त्या हॉटेलवर पोखरकरने जाऊन राडा केला. हवेत गोळीबार केला. कोयते दाखवून दहशत निर्माण केली. महिला सदस्यांना मारहाण केली.
पोखरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलाकडून माझा खून घडवून आणण्याचा कट रचला. यांचे पुरावे माझ्या हाती लागले आहे. माजी खासदार या गोष्टींना खतपाणी घालत आहे. आढळराव हे खेड तालुक्याच्या जीवावर तीन वेळा निवडून आले. मात्र, विकास काय केला हे त्यांनी जनतेला सांगावे. आमच्या मदतीने शिवसेनेचे पोखरकर यांनी पद मिळवले. त्याला आमदार मोहिते पाटील यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यायला पोखरकर यांनी नकार दिल्याने पुढील घटना घडल्या, असे सभापती अरुण चौधरी म्हणाले.