पुणे : ‘अरे आवाज कुणाचा’ च्या जल्लोषात सुरू असलेल्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून, अंतिम फेरीमध्ये नऊ संघ दाखल झाले आहेत. यामध्ये पुरूषोत्तम करंडकवर वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या मातब्बर संघाचाच अधिकांश समावेश आहे.
महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी महाविद्यालयांची चढाओढ लागल्याचे पाहायला मिळते. भरत नाट्य मंदिर येथे पंधरा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये एकूण 51 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 9 संघांची वर्णी लागली. त्यामध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालय (व्हिक्टिम), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय ( अफसाना), पी.ई.एस मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉर्नर), प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर ( पी.सी.ओ), गरवारे वाणिज्य महाविद्यालय ( टी.एल.ओ), मॉर्डन कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय ( रसिक), फर्ग्युसन महाविद्यालय ( विपाशा), स.प महाविद्यालय ( बातमी क्रमांक एक करोड एक) आणि बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय ( दोन पंथी) या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मानसी मागीकर, विनय कुलकर्णी आणि संजय पेंडसे यांनी काम पाहिले.
स्पर्धेची अंतिम फेरी १ आणि २ सप्टेंबर रोजी होणार असून, दर वर्षीप्रमाणे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी त्या त्या फेरीतील निकाल जाहीर होतील. ७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष किर्ती शिलेदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होईल.
स्पर्धेतील अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके :साईप्रसाद रेडकर ( एम फॉर सिंपथी- जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय), संयुक्ता कुलकर्णी ( 12 किमी- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ), कुणाल राशिंगकर ( कॉफीन-डॉ. डी.वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), उत्कर्ष खौदले ( भिंत-भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय), जय ऐडळेवर ( प्रयोग 10 वा-शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), ॠत्विक रास्ते ( मरीआईचा गाडा- टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य महाविद्यालय), प्रियांका भालेराव (बेस्ट ऑन अ स्टोरी- सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव बुद्रुक)