मुंबई : जर्मन बेकरी स्फोटातील दोषी हिमायत बेगची फाशी उच्च न्यायाालयाने रद्द केली.मात्र आरडीएक्स जवळ बाळगल्याबद्दल त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने कायम ठेवली. परंतु बेगची फाशीची शिक्षा रद्द झाल्याने महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाला (एटीएस) मोठा धक्का बसला आहे.पुणे सत्र न्यायालयाने १८ एप्रिल २०१३ रोजी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला बेगने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच फाशी कायम करण्याचे वैधानिक प्रकरणीही होते. न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे बेगचे अपील अंशत: मंजूर करून फाश्ीवर शिक्कामोर्तब करण्यास नकार दिला.एटीएसच्या म्हणण्यानुसार, बेग इंडियन मुजाहिद्दीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. एटीएसने या बॉम्बस्फोटप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण आठ आरोपी आहेत. त्यातील सहा फरारी दाखवण्यात आले आहेत. इंडियन मुजाहिद्दीनचा आॅपरेटिव्ह यासिन भटकळ, मोहसिन चौधरी, रियाझ भटकळ, इक्बाल इस्माईल भटकळ, फय्याझ कागजी आणि सय्यद झबीउद्दीन यांचा समावेश फरारी आरोपींमध्ये आहे. कतिल सिद्दिकी यालाही या प्रकरणात अटक झाली होती. मात्र येरवडा कारागृहात एका आरोपीबरोबर झालेल्या वादात त्याची हत्या करण्यात आली.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरण्यात आलेले बॉम्ब बेगच्या इंटरनेट कॅफेमध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर त्याने ते बॉम्ब घेऊन मोहसिन चौधरीबरोबर पुण्यापर्यंत प्रवास केला. जर्मन बेकरीमध्ये त्यानेच बॉम्ब ठेवले. तर बेगचे वकील मेहमूद प्रचा यांच्या म्हणण्यानुसार, बॉम्बस्फोटाच्या दिवशी बेग पुण्यात नव्हता. तो लातूरला नातेवाईकांच्या लग्नासाठी उपस्थित होता. बेकरीमध्ये बॉम्ब यासिन भटकळ आणि कतिल सिद्दिकी यांनी ठेवला होता. बेगने उच्च न्यायालयात अपिल केल्यानंतर सत्र न्यायालयापुढे बेगविरुद्ध साक्ष देणाऱ्या दोन साक्षीदारांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. एटीएसने दबावाखाली आपल्याला सत्र न्यायालयात बेगविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले. त्यामुळे उच्च न्यायालयात पुन्हा एकदा साक्ष नोंदवण्यात यावी, अशी त्यांची विनंती होती. मात्र बेगवरील सर्व आरोप रद्द करण्यात आल्याने साक्षीदारांनी केलेल्या अर्जाचा विचार करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने या साक्षीदारांचे अर्ज निकाली काढले. (प्रतिनिधी)बेग पुन्हा नागपूर कारागृहातबेगला पुन्हा एकदा नागपूर कारागृहात पाठवण्यात यावे, अशी विनंती विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केली. बचावपक्षाच्या वकिलांनी त्याठिकाणी बेगच्या जीवाला धोका असल्याने त्याला नागपूरला पाठवू नये, असे म्हणत विरोध केला. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मान्य करत बेगला नागपूर जेलमध्ये पाठवण्यास परवानगी दिली. बेगच्या शिक्षेत कपात झाली असली तरी त्याच्या वकिलांनी याही निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. मात्र विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.स्फोटात १७ ठार, ५८ जखमीपुणे येथील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या जर्मन बेकरीमध्ये १८ फेब्रुवारी २०१० मध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ जण मृत्युमुखी तर ५८ जण जखमी झाले. यामध्ये इटालियन, इराणी आणि स्वीडन नागरिकांचा समावेश होता. या बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीएसने सप्टेंबर २०१० मध्ये बेगला लातूर येथून राहत्या घरातून अटक केली. तसेच त्याच्या घरातून १२०० किलो आरडीएक्सही जप्त केले.
फाशी रद्द झाल्याने एटीएसला धक्का
By admin | Published: March 18, 2016 2:41 AM