राजू भिसे,नागोठणे- नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत ऐनघर गणातून काँग्रेस-सेना युतीचे सेनेचे संजय भोसले यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे शेकापचे उमेदवार भालचंद्र शिर्के यांचा ७२६ मतांनी पराभव करीत विजय मिळविला. या गणात १६ मतदान केंद्रे होती. यापैकी ९ ठिकाणी संजय भोसले, तर ७ ठिकाणी भालचंद्र शिर्के यांना मताधिक्य मिळाले होते. या ठिकाणी झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाचे रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर यांनी लढत देत १०५६ मते मिळविली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे काहीसे प्राबल्य असतानाही आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला येथे प्रभाव पाडता न आल्याने भोसले यांनी विजय मिळविला. ऐनघर पंचायत समिती गणात कडसुरे, वणी, भिसे, वरवठणे, आमडोशी, ऐनघर, पाटणसई, चेराठी, हेदवली, तामसोली, सुकेळी १ आणि २, चिकणी, वासगाव, बाळसई, वांगणी अशी एकूण १६ मतदान केंदे्र येतात. या मतदारसंघात यावेळी ९ हजार ८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. युतीचे संजय भोसले यांना ४७१९, आघाडीचे भालचंद्र शिर्के यांना ३९९३ मते पडून भोसलेंनी शिर्केंचा पराभव केला. भाजपाचे सोपान जांबेकर यांना १०५६ मते मिळाली. या निवडणुकीत सेनेचे संजय भोसले यांना कडसुरे, पाटणसई, आमडोशी, ऐनघर, हेदवली, सुकेळी १-२ गाव आणि वांगणी या नऊ मतदान केंद्रांवर मिळालेले मताधिक्य विजयापर्यंत घेऊन गेले. शेकापचे भालचंद्र शिर्के यांनी ७ ठिकाणी मताधिक्य मिळविले. यात वणी, भिसे, वरवठणे, चेराठी, तामसोली, चिकणी, बाळसई या सात केंद्रांचा समावेश आहे. याचवेळी झालेल्या जिल्हा परिषद गटाच्या मतदानात राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र जैन यांनी कडसुरे, वणी, चेराठी, भिसे आणि चिकणी या पाचच ठिकाणी आघाडी घेतली असल्याने त्याच्या तुलनेत पं. स. गणाचे आघाडीचे शेकापचे भालचंद्र शिर्के यांनी ७ ठिकाणी आघाडी घेतली आहे व त्याचा फायदा सेनेचे किशोर जैन यांना झाला असल्याने, या ठिकाणीसुद्धा क्र ॉस व्होटिंग झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. या मतदारसंघात कडसुरे, वरवठणे, वणी, भिसे, ऐनघर, वांगणी आणि पाटणसई या सात ग्रामपंचायती येतात. कडसुरे, वांगणी आणि वरवठणे या ग्रा. पं. शेकापच्या ताब्यात आहेत. शेकापचे भालचंद्र शिर्के कडसुरे ग्रा. पं.चे विद्यमान सरपंच आहेत. मात्र, या ठिकाणी सेनेचे भोसले यांनी ५९ मतांची आघाडी घेतली. तर वरवठणेत शिर्केना १३५ मतांची आघाडी देत तेथील मतदार शेकापच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वांगणी ग्रा. पं. हद्दीत वांगणी व आमडोशी ही दोन मतदान केंद्र येतात. सेनेचे संजय भोसले यांनी वांगणी केंद्रात १५ आणि आमडोशी केंद्रात १८६ मतांची मजबूत अशी आघाडी घेतली असल्याने राष्ट्रवादी-शेकाप आघाडी येथे कमी का पडली? अशी चर्चा होताना दिसून येत आहे. वणी ग्रा. पं. सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. या ठिकाणी सेना-काँग्रेस युतीला मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना शेकाप- राष्ट्रवादी आघाडीने १९७ मतांची भक्कम अशी आघाडी घेतली असल्याने काँग्रेसच्या वर्चस्वाला येथे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे चर्चिले जात आहे. भिसे आणि पाटणसई या दोन ग्रा. पं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. भिसे हद्दीतील मतदार आघाडीच्या माध्यमातून शेकापच्या पाठीशी उभे राहिले असून, त्याठिकाणी शेकापला ४४ मतांची आघाडी मिळाली आहे, तर पाटणसई ग्रा. पं. हद्दीत असणाऱ्या पाटणसईसह चिकणी आणि वासगाव या तीन केंद्रांत चिकणी वगळता इतर दोन्ही ठिकाणी सेनेचे भोसले यांनी आघाडी घेतली.
ऐनघर गणात प्रस्थापितांना धक्का
By admin | Published: February 27, 2017 3:03 AM