विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीचा ‘सामना’च्या बातमीचा फलक मंगळवारी भाजप आमदारांनी विधानसभेत मंत्र्यांसमोर फडकावताच शिवसेना आमदारांनी तो ओढला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाज तहकूब केले आणि दोन्हीकडील नेत्यांनी सदस्यांना शांत केले.
आजची घटना अशोभनीय असून सभागृहाच्या परंपरेला शोभेशी नाही, असे सांगत अध्यक्ष पटोले यांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना समज दिली आणि पुन्हा असा प्रकार घडू नये, असेही बजावले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या ठाकरे यांच्या मागणीची आठवण करून दिली. ही मदत जाहीर करीत नाही तोवर कामकाज चालवू नका, असे म्हणत त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.
लगेच भाजपच्या सदस्यांनी घोषणा सुरू केल्या. अध्यक्षांनी स्थगन फेटाळताच घोषणा वाढल्या. उद्धव ठाकरे तेव्हा सभागृहात होते. अतिवृष्टी झाली तेव्हा भाजपचे सरकार होते. तेव्हा मदत का केली नाही, आता का कांगावा करीत आहात? असे सांगत आमच्या सरकारने मागितलेली १४,६०० कोटी रुपयांची मदत आणायला केंद्राकडे चला, असा हल्लाबोल वित्तमंत्री जयंत पाटील यांनी केला. तेवढ्यात भाजपच्या सदस्यांनी फलक फडकविला. त्यावर शिवसेनेचे सदस्य संतप्त होऊन समोर आले. अध्यक्षाांनी फलक बाहेर नेण्यास सांगितले, पण भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. फलक हाती घेतलेल्या एकेका सदस्याचे नाव लिहा, असे आदेश पटोले यांनी दिल्यानंतर भाजपचा एकेक सदस्य बाजूला झाला. पण बदनापूरचे ाारायण कुचे आणि औसाचे अभिमन्यू पवार या दोन सदस्यांनी तो शिवसेना मंत्र्यांसमोर जाऊन दाखविणे सुरूच ठेवले. त्याचवेळी शिवसेनेचे बुलडाण्याचे संजय गायकवाड यांनी तो फलक जोरात ओढला.दोन्ही बाजूंचे सदस्य भिडले आणि प्रकरण हातघाईवर आले. वेलमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ज्येष्ठ सदस्य शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी सदस्यांना आवरले. भाजपच्या संतप्त सदस्यांना देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी शांत केले. अध्यक्ष पटोले यांनी आधी अर्ध्या तासासाठी तर तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा अध्यक्षांनी गोंधळी सदस्यांना समज दिली.
देवेंद्र फडणवीस यांनीही, विरोधी सदस्यांकडून चांगले वर्तन राखले जाईल, अशी हमी दिली. मात्र, याआधीही सदस्य फलक फडकवत असत, पण समोरच्या बाजूने ते कधीही फाडले गेले नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजप सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि लक्षवेधी सूचना व इतर कामकाज पुढे ढकलत व विधेयके गोंधळातच मंजूर करवून घेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.आधी सामना वाचला असता तर...आजच्या गदारोळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे मुखपत्र देवेंद्र फडणवीस आधी वाचत नव्हते. आता ते वाचत असल्याची कबुली त्यांनी दिली, हे बरे झाले. त्यांनी तो आधीच वाचला असता तर आमचा ‘सामना’ झाला नसता.विधान परिषदेतही विरोधकांची आरडाओरडशेतकºयांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करण्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातील बातमीचा फलक फडकविला. त्यानंतर, सत्तारूढ सदस्यांनी उठून फलक खेचायला सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.प्रचंड घोषणाबाजी, गोंधळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब झाले. त्यानंतर, वित्तमंत्री जयंत पाटील बोलत असताना विरोधकांनी आरडाओरड सुरू केली. सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी सदस्यांच्या गैरवर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.