ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 4- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले तसेच भाजपचे उमेदवार सतीय बहिरट या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे निवडणुक चिन्ह नाकारण्यात आले असून त्यांचे अपक्ष म्हणून नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये येऊन तिकीट देणा-या भाजपच्या पदाधिका-यांना या निर्णयाने धक्का बसला आहे.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी विजया पांगारकर यांनी रात्री आठ वाजता हा निर्णय दिला. रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला. तोपर्यंत त्यांनी ऑनलाईन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपच्या पदाधिका-यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देण्याचे सोपस्कार करुन घेतले व त्यांना भाजपचा ए व बी फॉर्म दिला.
या जागेवर अगोदर भाजपने सतीश बहिरट यांना उमेदवारी जाहीर करुन गुरुवारीच ए व बी फॉर्म दिला होता. त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर रेश्मा भोसले यांनी भाजपचा ए व बी फॉर्म घेऊन अर्ज दाखल केला. पक्षाने भोसले याच आमच्या उमेदवार असल्याचे पत्रही त्यांना दिले होते.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी दुपारी ४ वाजता प्रभाग ७ डमधील अर्जाची छाननी सुरु झाली तेव्हा काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट व भाजपचे उमेदवार सतीश बहिरट यांनी रेश्मा भोसले यांच्या अर्जाला हरकत घेतली. तेव्हा भोसले यांच्या वतीने वकीलांने म्हणणे मांडले़ निवडणुक आयोगाने ६ जानेवारी २००७ मध्ये एक अधिसुचना काढली होती. त्यात जर एकाच पक्षाने एकाच जागेसाठी एका पेक्षा अधिक ए व बी फॉर्म देण्यात येतात. त्यावेळी जर त्या पक्षाने उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत नेमक्या कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावयाची असे पत्र संबंधित निवडणुक निर्णय अधिका-यांकडे दिले असेल तर त्या उमेदवारांना त्या पक्षाची उमेदवारी देण्यात यावी असे त्यात म्हटले आहे.
या अधिसूचनेचा आधार घेऊन भाजपने आपल्या रेश्मा भोसले याच उमेदवार असल्याचे म्हणणे सादर केले. त्यानंतर निवडणुक अधिकारी पांगारकर यांनी याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता निर्णय देण्याचे जाहीर केले.
त्यानुसार सायंकाळी सात वाजता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली़ तेव्हा विरोधकांनी भोसले यांचा ऑनलाईन अर्ज हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भरला असून त्यात त्यांनी घड्याळ या चिन्हाची मागणी केली आहे तसेच तोच अर्ज त्यांनी सादर केला आहे तसेच त्यांनी पक्षाचे म्हणून सादर केलेल्या पत्राबाबतही हरकत घेतली. त्यांनी आपल्यावरील गुन्हेगारीविषयीची माहिती दिली नसल्याचीही हरकत घेतली यानंतर पांगारकर यांनी आपला निर्णय सुनावला.
रेश्मा भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्ज भरला असल्याने त्यांना भाजपने दिलेले उमेदवारीचे पत्र रद्द ठरविले. पक्षाने रेश्मा भोसले यांना पक्षाने अधिकृत उमेदवार ठरविले असल्याने सतीश बहिरट यांना अगोदर पक्षाने दिलेले पत्रही रद्द ठरविलेय त्यामुळे त्यांनाही भाजपचे चिन्ह नाकारण्यात आले.या निर्णयानंतर सतीश बहिरट आणि काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्या कार्यकर्त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातच जल्लोष केला.
धनशक्तीची हार, एकनिष्ठेचा विजय
आपण गेली २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहे़ आपल्याला उमेदवारी दिली जाणार असल्याचे यापूर्वीच पक्षाच्या पदाधिका-यांनी सांगितले होते. गुरुवारी दुपारी आपण पक्ष निधी म्हणून २ लाख रुपयांचा डिमांडड्राफ्ट दिला. त्यानंतर आपल्याला पक्षकार्यालयातून ए व बी फॉर्म देण्यात आला़ त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी आपण भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरला. तेथून बाहेर आल्यावर पक्षाने तुमची उमेदवारी रद्द केल्याचे मला सांगण्यात आले. कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारुन पक्षाबाहेरच्यांना उमेदवारी देण्यामुळे ही परिस्थिती आली. हा धनशक्तीची हार असून एकनिष्ठेचा विजय आहे़
सतीश बहिरट