मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निकालाने धक्का बसल्याची पक्षात चर्चा आहे. शिवसेनेचा सत्तेमुळे वाढता दबदबा मुंबईसह अन्य महापालिकांत डोकेदुखी ठरण्याची भीती भाजपा वर्तुळात व्यक्त होत आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला जेमतेम ६ जागा मिळाल्या तर औरंगाबाद महापालिकेत पक्षाच्या जागांची संख्या वाढली असली तरी एमआयएमने भाजपाला पिछाडीवर टाकल्याने पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. राज्यातील सत्तेत मोठा भागीदार असलेल्या पक्षाची ही परिस्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारी असल्याचे पक्षातील काहींचे मत आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल व किमान ११० ते १४२ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास मुंबईतील भाजपाच्या एका मातब्बर नेत्याने व्यक्त केला होता. विकास आराखडा, मेट्रो, कोस्टल रोड अशा सर्वच प्रश्नांवर भाजपाने सर्वप्रथम भूमिका घेण्यामागे महापालिकेत मुसंडी मारणे हाच हेतू असल्याचे हा नेता म्हणाला. मुंबई महापालिकेतील शिवसेनेबरोबरच्या युतीत आतापर्यंत भाजपा हा दुय्यम पक्ष राहिला आहे. मागील निवडणुकीत भाजपा ६३ जागा लढला व त्यांचे ३१ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवायची तर २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेत भाजपाला किमान १०० उमेदवार बाहेरून गोळा करावे लागतील. नवी मुंबईत भाजपाने ४३ जागा लढवल्या. त्यामध्ये केवळ एक उमेदवार हा मूळ भाजपाचा होता. बाकी ४२ उमेदवार हे आयाराम होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आयारामांच्या भरवशावर महापालिका काबीज करु पाहणाऱ्या भाजपाला नवी मुंबईतील मतदारांनी झटका दिला. मुंबईत तशाच पद्धतीने बाहेरून लोक आणून स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार भाजपाचे नेते करीत असतील तर त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपातील काहींचे मत आहे.शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे की नाही यावर भाजपात दोन मतप्रवाह होते. शिवसेनेने सत्तेत सहभागी झाल्यावर सत्तेपासून ताकद मिळवली आणि भाजपावर वेगवेगळ््या समस्यांकरिता हल्ले करीत विरोधी पक्षाची स्पेस काबीज केल्याचा लाभ त्या पक्षाला झाला आहे. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक नसती तर शिवसेनेने भाजपासोबत युती केली नसती, असे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाच्या इराद्याला सेनेचा धक्का
By admin | Published: April 25, 2015 4:02 AM