ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - ‘राजसंन्यास’ या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा पुण्यातील संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून सोशल मीडियावरही हा विषय चर्चेत होता. अनेक मराठी कलाकारांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत आपल्या पोस्टमधून कृतीचा निषेध नोंदवला. त्यामध्ये अभिनेता जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर, अभिनेता- दिग्दर्शक सुबोध भावे यांचा समावेश आहे.
अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून घराघरांत पोहोचलेला गुणी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याच्या फेसबूक वॉलवर संताप व्यक्त केला असून ' जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाही, तोपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही' अशी ठाम भूमिका मांडली आहे. ' मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही... मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माझ्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही! राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय? मी ह्या घटनेचा निषेध करतो आणि जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यंत मी पुण्यात प्रयोग करणार नाही' असे त्याने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर लेख-अभिनेता चिन्मय मांडलेकरनेही या भ्याड कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ' किती भ्याड आहात तुम्ही? रात्रीच्या अंधारात, तुमच्या कारवाया करता! नाव त्यांचं लावता ज्यांनी जिवंतपणे डोळे उपटले जाण्याची वेदना ही शौर्याने सहन केली. खरंच कीव येते तुमची, तुमच्या बुद्धीची. महाराज यांना माफ करा, हे काय करतायत यांचं यांनाच माहीत नाही!' अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने नोंदवली असून अनेक कलाकांरानी त्याची पोस्ट लाईक करत पाठिंबा दर्शवला आहे.
अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावेनेही अशाच आशयाची पोस्ट करत आपला संताप नोंदवला आहे. ' तरूण महाराष्ट्राला काही कृती देता येत नसेल तर विकृती देऊ नका... जाहीर निषेध!' अशा शब्दांत सुबोधने फेसबूक पोस्टद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास समाजकंटकांनी हे कृत्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातामध्ये कुऱ्हाड आणि हातोडे घेतलेले चार तरुण मंगळवारी मध्यरात्री १.५० वाजता उद्यानामध्ये घुसले. त्यांनी पुतळ्यावर कुऱ्हाड आणि हातोड्याने घाव घातले. हा पुतळा खाली पाडल्यानंतर दोघांनी उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहात असलेल्या मुठेच्या पात्रामध्ये नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अगदी दोन मिनिटांत आटोपला. त्यानंतर, पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा फोडला असून हा पुतळा गटारगंगेत टाकून दिला, असा मेसेज व्हॉट्सअॅपसह सोशल मिडीयावर व्हायरल केला. या मेसेजमध्ये अटक केलेल्या चौघांची नावे होती. तसेच स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचेही म्हटले होते. पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कारंज्याजवळील इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत. यात संपूर्ण घटना कैद झाली आहे.
या घटनेमागे संभाजी ब्रिगेडचा हात असल्याची चर्चा सुरू असतानाच ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ' नाटकामधून राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. त्यांनी महाराजांना बदफैली, व्यसनी अशी बिरुदे लावली आहेत. आम्ही गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेकडे हा पुतळा काढून घेण्यासंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा स्वत:हून बाजुला केला' असे त्यांनी म्हटले.
दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र संतापाचे वातावरण दिसत असतानाच ' गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल' असे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.