ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करणारे अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे या दोघांना डेक्कन पोलिसांनी समज दिली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही, असे स्पष्ट करत कार्यक्रम घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डेक्कन पोलिसांनी दिला आहे.
3 जानेवारी रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवून नदीत फेकला होता. त्यानंतर 31 जानेवारी रोजी संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी संभाजी उद्यानात एकत्र येण्याचे आवाहन पुष्कर श्रोत्री आणि शरद पोक्षेंनी केले होते.
तसेच 'जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाही, तोपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही' अशी ठाम भूमिका पुष्कर श्रोतीने मांडली होती. ' मी जात, पात, धर्म, पंथ मानत नाही... मला एकच कळतं की मी कलाकार म्हणून जन्माला आलोय, आणि माझ्या कलेचा अपमान मी खपवून घेणार नाही! राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय? मी ह्या घटनेचा निषेध करतो आणि जोपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाहीत, तोपर्यंत मी पुण्यात प्रयोग करणार नाही' असे त्याने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते.