मुंबई : अनेक हिंदू व मराठी कुटुंबे श्रावण महिन्यात, गणेशोत्सवात, नवरात्रोत्सवात महिनाभर किंवा आठ-दहा दिवस मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणात मुंबईतील कत्तलखाने केवळ चार दिवस नव्हे तर आठ दिवस बंद ठेवण्यात काहीच गैर नाही, असे मत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले.मेहता म्हणाले की, नियमित मांसाहार करणारे हिंदू व मराठी भाषिक त्यांच्या सणासुदीला मांसाहार पूर्णपणे बंद ठेवतात. मुस्लीम बांधवही त्यांच्या सणाला मांसाहार टाळतात. त्यामुळे जैन धर्मीयांच्या पर्युषणाच्या काळात आठ दिवस कत्तलखाने बंद राहिले तर काहीच बिघडत नाही. पर्युषणाच्या काळात गोवंश हत्या होऊ नये याकरिता ही मागणी केली जाते. राज्यात १९९५ ते १९९९ युतीची सत्ता असताना आम्ही दिवसरात्र जागून गोवंश हत्याबंदीचा कायदा केला होता. त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी हा आग्रह आमच्या सरकारने धरणे यात काही गैर नाही. मूळात मुंबई महापालिकेने कत्तलखाना सुरु केला तो मुंबईतील मांसाहार करणाऱ्या लोकांना ताजे व स्वच्छ मटण मिळावे म्हणून. परंतु सध्या या कत्तलखान्यातून मटणाची निर्यात होत असेल तर हा मूळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असेही मेहता म्हणाले.दरम्यान, पर्युषणाच्या काळात कत्तलखाने बंद ठेवणे हा सरकारचा निर्णय नसून महापालिकांचा निर्णय आहे, असे मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केले असून दोन-चार दिवस कत्तलखाने बंद ठेवणे म्हणजे मांसाहार बंद करणे असा होत नाही. जनतेने ज्यांना नाकारले त्या मनसेला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही शेलार यांनी लगावला. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेतेही या विषयावर आक्रमक झाले असून भाजपाच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचे सांगत आहेत. (विशेष प्रतिनिधी) - सभागृहात भाजपवर सर्व पक्षातून टीका झाली. शिवसेनेनेही या बंदीला विरोध केला. यानंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी ४ दिवस मांसबंदीच्या परिपत्रकाचा पुर्नविचार करावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले. - सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष अशा सर्व पक्षांनीही विरोध केला. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. खाण्याविषयी भाजपने भूमिका मांडलेली नाही. विरोध करणारे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असे भाजपचे मनोज कोटक म्हणाले.
पर्युषणात कत्तलखाने बंद ठेवा
By admin | Published: September 09, 2015 1:01 AM