मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात परळच्या महर्षी दयानंद (एमडी) महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे यांचे निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले कारंडे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी होते. त्यांच्या जाण्याने एमडी कॉलेजचे एनएसएस युनिट पोरके झाले आहे.पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा मानस डॉ. कारंडे यांनी नुकताच ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता. यासंदर्भात शनिवारी त्यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या कारंडे यांच्यावर पर्यावरण दिनीच काळाने घाला घातला. त्यामुळे एनएसएस युनिटसह संपूर्ण महाविद्यालयात हळहळ व्यक्त होत आहे.भांडुपचे ‘नाना सर’ सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे भांडुपकरांचे ‘नाना सर’ म्हणजेच अविनाश कारंडे यांच्या मृत्यूने भांडुपकरांवर शोककळा पसरली आहे. अविनाश कारंडे यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील सोनवडे होते. भांडुप पश्चिमेकडील भट्टीपाडा येथील अंबाजी धाम इमारतीत ते राहत. त्यांची मोठी मुलगी वेदिका सहावीत तर आरुशी पहिलीत आहे. सुट्टीसाठी त्यांच्या दोन्ही मुली आईसोबत गावी साताऱ्याला गेल्या होत्या. शाळा सुरु होणार असल्याने ते कुटुंबीयांना घरी आणण्यासाठी ते गावी गेले. परतताना पुणे- मुंबई येथील अपघातात अविनाश यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीसह दोन मुली जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा येथील सोनवडे गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे त्यांची आतेबहिण हर्षदा भोसले यांनी सांगितले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ७० वर्षीय चारुलता रामचंद्र आरोलकरांनाही याचा खुप मोठा धक्का बसला आहे. त्या म्हणतात, चाळीत प्रत्येक मुलाला शिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश पुढे असत. (प्रतिनिधी)उत्कृष्ट शिक्षक हरपलाकारंडे सरांच्या मेहनतीमुळे महाविद्यालयाला दोनवेळा राज्यस्तरीय उत्कृष्ट एनएसएस युनिटचा पुरस्कार मिळाला होता. कोणताही कार्यक्रम असो त्यांचा सहभाग निश्चित असे. त्यांच्या अचानक जाण्याने महाविद्यालयाला धक्का बसला आहे. - टी.पी. घुले, प्राचार्या, महर्षी दयानंद महाविद्यालय
विद्यार्थीप्रिय प्राध्यापकावर घाला
By admin | Published: June 06, 2016 3:02 AM