मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्यानंतर देशभरात विविध चर्चेला उधाण आले आहे. नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा केजरीवाल पुढे घेऊन जातायेत असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला. गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी हिंदुत्व कार्ड पुढे आणल्याचं म्हटलं जात आहे.
मात्र अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या नोटेचा फोटोही ट्विट केला आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, ही माझी वैयक्तिक भावना आहे. शिवप्रेमी म्हणून मी व्यक्त झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना देशात नाही तर जगात मान्यता आहे. अशा महापुरुषाचा फोटो नोटांवर टाकला तर योग्य राहील ही माझी भावना आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ही चर्चा सोशल मीडियात सुरू होती. त्यामुळे मी माझी भावना व्यक्त केल्या. ज्यापद्धतीने माझ्या नजरेसमोर हा विषय आला तेव्हा मी भावना व्यक्त केली. जर केंद्र सरकार अशाप्रकारे विचार करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नोटांवर आला तर यापेक्षा मोठा बहुमान असू शकत नाही. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या ध्वजात महाराजांच्या विचारांना अनुसरून चिन्ह प्रकाशित केले. महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे. वरिष्ठ पातळीवर अशी काय शक्यता आहे का ते तपासून पत्राद्वारे मागणी करेन असंही नितेश राणे म्हणाले.
अरविंद केजरीवालांची केंद्राकडे मागणीभारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. ही मागणी म्हणजे गुजरात निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. 'लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि केवळ दोन टक्के हिंदू आहेत. मुस्लीम राष्ट्र असूनही तिथल्या नोटांवर गणपतीचे छायाचित्र आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"