गडचिरोली : नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याबद्दल दोषी ठरवत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय विजय तिरकी यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतील युवा कार्यकर्त्यांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणे, नक्षल्यांसाठी थिंक टँक म्हणून काम करणे, असे प्रा. साईबाबा याच्यावरील आरोप सिद्ध झाले. जामिनावर असलेल्या साईबाबाला शिक्षा ठोठावल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींचे वकील सुरेंद्र्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा फौजफोटाही होता.गडचिरोली पोलिसांनी आॅगस्ट २०१३ मध्ये जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा याला महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्यासह अटक केली होती. मिश्राच्या माहितीवरुन सप्टेंबर २०१३ मध्ये प्रशांत राही यास अटक केली. त्यानंतर ९ मे २०१४ रोजी साईबाबालाही अटक केली होती. प्रा. साईबाबा ९० टक्के अपंग असल्याने त्याच्या प्रकृतीबाबत सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राला रिट याचिका म्हणून दाखल करुन घेत न्यायालयाने प्रा. साईबाबाला ३० जून २०१५ रोजी तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला. तो पुढे ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला. अशातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ सप्टेंबर २०१५ रोजी हेम मिश्राची जामिनावर मुक्तता केली. मात्र, खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी मुंबई खंडपीठाचा हस्तक्षेप अमान्य करीत २३ डिसेंबर २०१५ रोजी साईबाबा याचा जामीन अर्ज नामंजूर केला आणि ४८ तासांमध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर साईबाबाने २५ डिसेंबर २०१५ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याचदिवशी त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. (प्रतिनिधी)नक्षलवादी चळवळीला जबर धक्का - प्रा. साईबाबाला झालेली शिक्षा ही नक्षलवादी संघटनेसाठी एक जबर धक्का मानला जात आहे. यामुळे साईबाबा याच्याप्रमाणे जे इतर माओवादाचा प्रसार करणारे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण क्षेत्रात राहून माओवादाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.- जिल्हा न्यायालयाने ४ मार्च २०१६ पासून नियमीत सुनावणी सुरु केली. ३१ मार्चपर्यंत आठही साक्षीदारांची साक्ष नोंदविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल २०१६ रोजी साईबाबाला जामीन मंजूर केला होता. - शिक्षेवरील सुनावणीत विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर प्रशांत सत्यनाथन यांनी केवळ अपंग असल्याच्या कारणाने साईबाबाला माफ करु नये, त्याचे गुन्हे गंभीर आणि समाजविघातक असल्याने कडक शिक्षेची मागणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. सत्यनाथन, अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.
प्रा. साईबाबासह पाच जणांना जन्मठेप
By admin | Published: March 08, 2017 5:54 AM