ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या गुन्ह्यात बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपयांची खंडणी मागणा-या इंदापूर येथील भष्ट्राचारविरोधी युवक संघर्ष समितीच्या संस्थापक प्रदेशाध्यक्षासह दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली़ सेंट्रल बिल्डिंगमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत सापळा रचून मंगळवारी सायंकाळी या दोघांना पकडण्यात आले़
नितीन मारुती आरडे आणि प्रकाश सूर्यभान आरडे (दोघेही रा़ हिंगणेगाव, ता़ इंदापूर) अशी त्यांची नावे आहेत़ नितीन आरडे हे भष्ट्राचारविरोधी युवक संघर्ष महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहेत़ अजयकुमार बाबुराव भोसले यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ भोसले यांच्यावर श्रीगोंदा येथे २००८ मध्ये विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होता़ त्या खटल्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़ या गुन्ह्याची माहिती सर्वांना सांगून तुमची बदनामी करु, असे हे दोघे जण त्यांना सांगून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागत होते़ भोसले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे भोसले यांना आरडे यांना पैसे घेण्यासाठी बोलविले़ पोलिसांनी भोसले यांच्या कार्यालयाजवळ सापळा रचला होता़ भोसले यांच्याकडून पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले़