ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर आता नागरिकांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. पीडब्लूडीच्या उत्तर विभागातील कार्यालयात अत्याधुनिक आयपी कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याचे थेट छायाचित्रण पाहण्याची सुविधा नागरिकांना दिली जाणार आहे. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रथमच पुण्यातून या पथदर्शी प्रकल्पास सुरूवात होत आहे.
कॅम्प येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील पीडब्लूडीच्या निविदा, धनादेश काढणारा, लेखापरीक्षण, स्टोअर व कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात आयपी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विविध बांधकामे, त्यांचे ठेकेदार व कामाचे ठेके यामुळे पीडब्लूडी विभाग नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा कामकाजात पारदर्शकता नसल्याची टीका देखील होत असते. या उलटसुलट चर्चेला उत्तर देण््यासाठी पीडब्लूडीच्या कार्यालयात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे थेट चित्रण पाहण्याची सोय नागरिकांना उलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या अँड्रॉईड फोनवर देखील थेट चित्रण पाहता येऊ शकते.
त्यासाठी कार्यालयात खास आयपी कॅमेरे (इंटरनेट प्रोटोकॉल) बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे इंटरनेटला जोडता येऊ शकतात. या कॅमेºयांचा आयपी अॅड्रेस पीडब्लूडीच्या संकेतस्थळावर येत्या महिन्याभरात देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक कार्यालयातील कामकाजाचे थेट चित्रण पाहू शकतील, अशी माहिती पीडब्लूडीचे (उत्तर) कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी दिली.
महिनाभरात कामांची किती बिले जमा झाली, किती बिलांची रक्कम मंजुर करण्यात आली, बिलांच्या किती रक्कमेचे वितरण झाले याची सर्व माहिती दर एक तारखेला जाहीर केली जाणार आहे. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.
कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कार्यालयात आयपी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमे-याची लिंक येत्या महिनाभरात www.mahapwd.com या संकेतस्थळावर देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनाही कार्यालयातील कामकाजाचे थेट चित्रण पाहता येणार आहे.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, पीडब्लूडी