मुंबई : "प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते विधानसभेत बोलत होते.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. मागच्या आठवड्यात अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणाबाजी केल्याचे म्हणत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली होती. तसेच, अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला होता. आज विधानसभेत अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले.
अजित पवार यांनी १० वर्षांच्या अनुभवातील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. तसेच, शेरोशायरीतून अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मी अर्थसंकल्प मांडला, त्यावर काहींनी टीका केली. विरोधकांचे विरोध करणं काम आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीही सांगितल्या. अर्थसंकल्प फुटल्याचे वक्तव्य काही सदस्यांनी केले. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील हे सिनियर असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनियता राखलेली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले. जयंतरावांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. मी १० वेळा बजेट मांडलं. त्यामुळं थोडा बहुत अनुभव आहे. महाविकास आघाडी असो महायुती असो मी दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडला. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात, तिकडनं मांडला की इकडचे टीका करायचे, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.
पुढे अजित पवार म्हणाले, कोरोना काळात महसुल कमी जमा झाला. आता मागील वर्षाच्या तुलनेन ११ टक्के महसुल वाढ झाली आहे. साधारण २५-३० हजार कोटी महसुलात वाढ होताना दिसत आहे. जीएसटी व्हॅट तसंच इतर करामुळे ही वाढ होत आहे. कर माध्यमातून उत्त्पन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.