संजीव वेलणकर
पुणे, दि. ३ - लक्ष्मीकांत-प्यारेलाल या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी प्यारेलाल शर्मा यांचा आज (३ सप्टेंबर) वाढदिवस.
मा.प्यारेलाल शर्मा यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली. प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बर्यांपैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले.
व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिनवादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्याी चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्यां चे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही. प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणतात की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही. आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला. १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या ए ग्रेड कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. ‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणे कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एकच होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली. लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली. संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू लक्ष्मीकांत-प्यारेलाल बद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता.
१९६३ ते १९९८ या कालावधीत तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना लोकप्रिय संगीत देणारी जोडी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल! सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून याच जोडीचे नाव चित्रपटसंगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. त्या काळात लोकप्रियतेचा आणि गुणवत्तेचा निकष मानली जाणारी ‘बिनाका गीतमाला’ लोकप्रिय होती. पारसमणी या पहिल्याच चित्रपटातले ‘हसता हुवा नूरानी चेहरा’ हे गाणे ‘बिनाका’ मध्ये वाजलेले पहिले गाणे ठरले. त्यानंतर सलग १६ गाणी या मालिकेत गाजली. बिनाकाच्या वार्षिक उत्सवात तर ५० पैकी ३२ गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची होती. एकूण १७४ गाणी बिनाकामध्ये आली. हा एक विक्रम आहे. लोकमत समूहाकडून वाढदिवसाच्या प्यारेलाल यांना शुभेच्छा...
मा.लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेली काही गाणी
मै शायर तो नही
सारेरामा प
सत्यम शिवम् सुंदरम
सुनो सजना
मुझे तेरी महोबत्त का
हम तुम दोनो जब मिल जायेंगे
आनेसे उसके आई बहार