नागपूर : आगामी तीन वर्षांत राज्यातील वीज वितरण यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करुन दर्जेदार ऊर्जा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली़ ‘लोकमत’कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर बावनकुळे यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी विविध उपाययोजनांवर चर्चा केली़ बावनकुळे म्हणाले, जर्मनीच्या मॉडेलची अंमलबजावणी करून नागपूरसह राज्यातील इतर मोठ्या शहरांतील वीज वितरण यंत्रणेत सुधारणा केली जाईल़ यापुढे ही यंत्रणा भूमिगत केली जाणार असून, शासनाने यासाठी दोन हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे़ पैकी नागपूरला १०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचे ते म्हणाले़ ग्रामीण भागात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘फीडर सेपरेशन’ योजना तयार केली असून, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत केंद्राकडे चार हजार कोटींची मागणी केली आहे. राज्यातील हजारो गावांना कृषीबहुल ‘फीडर’सोबत जोडल्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. कृषीपंपांना दिवसातून आठ तास वीज पुरविली जाते़ त्यामुळे गावांनादेखील तितकीच तास वीज मिळते. ‘फीडर सेपरेशन’अंतर्गत गाव तसेच कृषीपंपांसाठी वेगळे ‘फीडर’ बसविण्यात येतील़ यामुळे या दोन्ही अडचणी दूर होतील, असा दावा त्यांनी केला़ दरम्यान, वीज निर्मिती ते वितरणापर्यंत होणाऱ्या खर्चात बचत करून वीज दर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
राज्यात तीन वर्षांत ‘क्वॉलिटी पॉवर’ देणार
By admin | Published: April 27, 2015 3:46 AM