बीड : बँकेची रक्कम लुटण्यासाठी त्याने भूसुरुंग स्फोट केला. अटक झाली, तुरुंगातून दोनदा पळाला अन् नंतर तो पोलिसांच्या तावडीत आलाच नाही. सात वर्षांत त्याने बँकफोडीचे ३० पेक्षा अधिक गुन्हे करून संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. नावे बदलून डझनभर बँका फोडल्या. या अट्टल दरोडेखोराच्या रविवारी बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या.ज्ञानेश्वर जगन्नाथ लोेकरे (रा. टेंभूर्णी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. बीड पोलसांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या बँकफोडीच्या टोळीचा तो मास्टरमाइंड आहे. २४ नोव्हेंबर २०१३ रोजी कडा (ता. आष्टी) येथील स्टेट बँक तर ८ डिसेंबर २०१३ रोजी पाटोदा येथे शाहू बँक फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष्मण कळसे, संभाजी गाढवे, अविनाश काळे, सचिन काळे या चौघांना जेरबंद केले होते. या टोळीचा म्होरक्या ज्ञानेश्वरला अहमदगनर येथून रविवारी रात्री ताब्यात घेतले. सहावी पास ज्ञानेश्वर विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. वयाच्या २५व्या वर्षापासून तो गुन्हेगारी जगतात आहे. कामानिमित्त २००७ मध्ये तो सिंधुदुर्ग येथे गेला होता. आयसीआयसीआय बँकेची रोकड लुटण्याचा त्याने कट रचला. सावंतवाडीजवळ एका घाटात त्याने भूसुरुंग पुरला होता. तेव्हा डोंगरात दडून बसलेल्या ज्ञानेश्वरला अटक झाली; पण एकदा दवाखान्यातून तो पळून गेला. नंतर तीन वर्षे तो कारागृहात होता. २०१० मध्ये त्याने जेलच्या भिंतीवर चढून पलायन केले. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. (प्रतिनिधी)मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात गुन्हेज्ञानेश्वरने मराठवाड्यातील परभणी, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, बीड येथे बँकफोडीचे गुन्हे केले. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, पुणे येथेही हात साफ केला आहे.
बँकफोडीतील ‘एक्सपर्ट’ निघाला कोट्यधीश !
By admin | Published: January 06, 2015 2:11 AM